नाले, खाड्यांमध्ये बेकायदा बांधकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:01+5:302021-03-21T04:40:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भाईंदरमधील नैसर्गिक ओढे, नाले व खाड्या या बेकायदा भराव व बांधकामांच्या विळख्यात सापडल्या ...

नाले, खाड्यांमध्ये बेकायदा बांधकामे
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भाईंदरमधील नैसर्गिक ओढे, नाले व खाड्या या बेकायदा भराव व बांधकामांच्या विळख्यात सापडल्या आहेत. त्यातच, नाले हे कचरा व गाळाने भरले आहेत. नवनियुक्त आयुक्त दिलीप ढोले यांच्या नाल्यांच्या पाहणी दौऱ्यातच हे गंभीर प्रकार उघडकीस आले असून अतिक्रमण व आरोग्य विभागातील बेजबाबदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.
आयुक्त ढोले यांनी शुक्रवारी उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्यासह नाल्यांची पावसाळ्यापूर्वीच्या सफाईच्या अनुषंगाने पाहणी केली. यावेळी नाल्यात कचरा व गाळ साचल्याचे आढळले. नाल्यांना लागून बेकायदा बांधकामे झाली आहेत. वास्तविक, पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीतही खाडीपात्र तसेच नैसर्गिक ओढे याला लागून सीआरझेडमध्येही बांधकामे करता येत नाहीत. असे असताना मीरा-भाईंदरमध्ये मात्र सर्रास कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे सुरूच आहे. परंतु, गंभीर बाब म्हणजे त्यात बेकायदा भराव करून बांधकामे उभी राहिली आहेत. त्यातच, बांधकाम विभाग व काही राजकारण्यांनी खाड्या, ओढेच अरुंद करून त्याला काँक्रिटच्या भिंती कोट्यवधी रुपये खर्च करून उभारल्या आहेत. या सर्व प्रकारांमुळे शहरातील ओढे, खाड्या व नाले हे अरुंद झाले असून पाण्याचा निचरा होण्यात अडथळा येतो. याबाबत उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
-----------------------------------------
नैसर्गिक ओढे, नाले व खाड्या या संरक्षित असून शहरात पूरस्थिती होऊ नये म्हणून त्या भागात कोणताही भराव व अतिक्रमण खपवून घेणार नाही. आपण संबंधित अधिकाऱ्यांना तसे स्पष्ट आदेश दिले असून कोणीही यात कसूर केली तर कारवाई केली जाईल. डेब्रिज, भराव, अतिक्रमण हटवण्यात येईल. नाले, खाडीत कचरा टाकणे सुरू राहिल्यास आरोग्य विभागावर जबाबदारी निश्चित केली जाईल. पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाई पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
- दिलीप ढोले, आयुक्त