दोषी आढळल्यास नगरसेवकांवर कारवाई, आयुक्तांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 03:56 AM2018-07-12T03:56:27+5:302018-07-12T03:56:53+5:30

मीरा- भार्इंदर महापालिकेत निवडून आलेल्या पाच नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या तक्रारींवर सोमवारी आयुक्तांनी सुनावणी घेतली. या वेळी दोन नगरसेवक अनुपस्थित होते.

 If found guilty, action on corporators | दोषी आढळल्यास नगरसेवकांवर कारवाई, आयुक्तांची ग्वाही

दोषी आढळल्यास नगरसेवकांवर कारवाई, आयुक्तांची ग्वाही

Next

मीरा रोड - मीरा- भार्इंदर महापालिकेत निवडून आलेल्या पाच नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या तक्रारींवर सोमवारी आयुक्तांनी सुनावणी घेतली. या वेळी दोन नगरसेवक अनुपस्थित होते. तर अन्य दोन नगरसेवकांचीही सुुनावणी होणार आहे. ज्या नगरसेवकां विरोधात तक्रारी आहेत त्यांची बाजू ऐकली जाईल. त्या नंतर योग्य तो निर्णय घेऊ. कुणालाही पाठिशी घालणे वा झुकते माप देण्यात येणार नाही. दोषी नगरसेवकांवर कारवाई करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. सचिव वासुदेव शिरवळकर उपस्थित होते.
काँग्रेस समर्थक नगरसेवक राजीव मेहरा यांनी उमेदवारी अर्जात त्यांच्यावर दाखल गुन्हा लपवला प्रकरणी पराभूत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार साबीर शेख व भाजपा उमेदवार साजी आयपी यांनी तक्रारी केल्या आहेत. शेख यांच्या तक्रारीवर सुनावणी असताना मेहरा यांनी आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे सुनावणी पुढे होणार आहे.
काँग्रेसचे नरेश पाटील यांनी उमेदवारी अर्जात आपली जन्मतारीख चुकीची व शिक्षण सातवी असताना नववीपर्यंत झाल्याची चुकीची माहिती दिल्याची तक्रार भाजपाचे डॉ. सुरेश येवले यांनी केली होती. त्यावर सुनावणीच्यावेळी पाटील यांनी आपली जन्मतारीख फक्त पॅनकार्डवर वेगळी असून बाकी सर्व दाखले कागदांवर अर्जात नमूद तारीखच आहे असे म्हटले. शिवाय अर्ज भरताना चुकून झाले असून सातवीचा शाळा सोडल्याचा दाखला अर्जासोबत जोडल्याचे सांगितले.
भाजपाच्या भार्इंदर पूर्व भागातील नगरसेविका मेघना रावल यांचे पती दीपक यांनी साईबाबानगर येथे एका हॉटेल इमारतीत बेकायदा बांधकाम केले म्हणून मेघना यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी इरबा कोनापुरे यांनी केली आहे. मूळात पालिकेने दिलेली इमारत बांधकाम परवानगीही चुकीची असल्याचे इरबा यांनी म्हटले होते. सुनावणीच्यावेळी मात्र मेघना या गैरहजर राहिल्या. आपण बाहेरगावी जात असल्याचे पत्र शनिवारी त्यांनी सचिवांना दिले होते. इरबा यांनी हा वेळकाढूपणा असून यापुढे मेघना यांना वेळ देऊ नये अशी मागणी केली.
कनकिया भागात बेकायदा बांधकाम करून कार्यालय, वाचनालय आदी चालवल्याने भाजपा नगरसेविका नीला सोन्स व नगरसेवक विजय राय यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची तक्रार ब्रिजेश शर्मा व रोलन मिरांडा यांनी केली होती. सुनावणीच्यावेळी या दोन्ही नगरसेवकांनी बांधकाम आपण नगरसेवक होण्यापूर्वी पासूनच पक्ष कार्यालय होते व ते कुणी बांधले याची माहिती नाही असा दावा केला. त्यावर मिरांडा यांनी जमीन आपल्या आजीची असून ती बळकावून बेकायदा बांधकाम केल्याचे म्हटले.

परशुराम म्हात्रे, अनिता पाटील यांच्यावर गुन्हे

पेणकरपाडा येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करुन बेकायदा बांधकाम प्रकरणी भाजपाचे नगरसेवक परशुराम म्हात्रे व शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

बांधकाम प्रकरणी सुनावणी आधीही झाली असा दावा तक्रारदार भरत मोकल यांचा आहे. तर दोन नगरसेवकांची सुनावणी लवकरच घेतली जाणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. याकडे आता लक्ष लागले आहे.

पालिकेने रावल यांचे बांधकाम बेकायदा असल्याचे स्पष्ट केल्याने आयुक्तांकडून लावकरच निर्णय होईल अशी आशा आहे. पण रावल या हजर न राहता वेळकाढूपणा करत आहेत. पालिकेने दबावाला बळी न पडता ठोस कार्यवाही करावी.
- इरबा कोनापुरे, तक्रारदार
 

Web Title:  If found guilty, action on corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.