आला रे आला... पाऊस आला !
By Admin | Updated: June 12, 2016 01:06 IST2016-06-12T01:06:46+5:302016-06-12T01:06:46+5:30
पाणीटंचाईमुळे तोंडचे पाणी पळालेल्या ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात शनिवारी सकाळी वळवाच्या सरी पडल्या आणि वातावरणात आल्हाददायक गारवा पसरला. गेले चार दिवस मान्सूनपूर्व

आला रे आला... पाऊस आला !
ठाणे : पाणीटंचाईमुळे तोंडचे पाणी पळालेल्या ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात शनिवारी सकाळी वळवाच्या सरी पडल्या आणि वातावरणात आल्हाददायक गारवा पसरला. गेले चार दिवस मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज फक्त व्यक्त होत होता. उकाडाही दिवसेंदिवस असह्य होत होता. मात्र, वरुणराजाने दमदार दर्शन घडवत वातावरणाचा नूर पालटून टाकला.
या पहिल्याच पावसाने ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. रेल्वेला तडाखा बसला. झाडे उन्मळून पडण्याच्या काही घटना घडल्या. सकाळी शहरात १३ मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. तापमानही ३५ ते ३७ अंशांवरून ३१ ते ३२ अंशांदरम्यान खाली आले.
जूनचे १० दिवस उलटूनही पावसाचा पत्ता नसल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होईल, अशी स्थिती गेल्या चार दिवसांत निर्माण झाली होती. यंदाही ७ जूनचा मुहूर्त पावसाने चुकवला. कोकणात दोन दिवसांपूर्वी वळवाच्या सरी कोसळल्याने ठाणे जिल्ह्यात तो कधी दाखल होईल, याचीच प्रतीक्षा होती. गेले चार-पाच दिवस ढग दाटून येत होते, पण पाऊस पडत नव्हता. मात्र, शनिवारी सकाळी पावसाने दर्शन दिले. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह ढग दाटून आले, तर काही भागांत गडगडाटी आवाज करत वरुणराजाने आगमनाची वर्दी दिली. कुठे तुरळक सरी, तर कुठे जोरदार तडाखे देत पावसाने नांदी दिली. अनेकांनी भिजण्याचा आनंद लुटला.
पावसाने हजेरी लावताच सोशल मीडियावर पहिल्या पावसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. कवितांची जणू काही मैफलच रंगली. (प्रतिनिधी)
कल्याण-डोंबिवलीत शिडकावा
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरातही पावसाचा शिडकावा झाला. सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते. पुन्हा वातावरणाने ११ वाजल्यापासून रूप पालटले. पुन्हा वातावरणात उकाडा सुरू झाला. दुपारनंतर मात्र पुन्हा कडकडीत ऊन पडले.
पावसात मुंब्य्राची बत्ती गुल
मुंब्रा : पावसाच्या पहिल्याच किरकोळ सरींनी मुंब्य्रातील वीजपुरवठा चार तास बंद झाला. दुपारी १ च्या दरम्यान तो पुन्हा खंडित झाला. दिवसभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले होते. ऐरोलीतील तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित झाल्याची माहिती महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने दिली.
मीरा-भार्इंदरमध्ये बरसल्या सरी
मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये सकाळी आणि संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्या. आल्हाददायक गारवा निर्माण झाला. अचानक आलेल्या पावसाने घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. बालगोपाळांसह मोठ्यांनीही पावसात भिजण्याचा आनंद लुटला. शहरात ठिकठिकाणी नागरिकांसह वाहनचालकांवर चिखलातून मार्ग काढण्याची वेळ आली. पालिकेच्या गलथानपणामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत. पावसात डांबरीकरण सुरू होईल, पण ते टिकणार नाही. पाऊस यंदा लवकर येणार, अशी शक्यता हवामान खात्याने वारंवार व्यक्त केली असली तरी पालिकेने ती गांभीर्याने घेतली नाही. परिणामी, भूमिगत गटारांसाठी खणलेले रस्ते, अंतर्गत रस्ते, गटारांची कामे रखडली आहेत.
८० वर्षीय जीर्ण झाड कोसळले
पावसाच्या पहिल्याच दिवशी
झाडे कोसळण्याच्या घटना शहरातील विविध भागांत घडल्या. नौपाडा परिसरातील एस.व्ही. रोड येथे तब्बल ८० वर्षांहून अधिक जीर्ण झालेले ३५ फुटी झाड कोसळले. या घटनेत वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी मात्र टळली.
एस.व्ही. रोड हा वर्दळीचा रोड असून आजूबाजूला इमारती आहेत. तसेच तेथे क्लासेसही आहेत. संध्याकाळी क्लास सुटल्यावर येथे विद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र, ते सुटण्यापूर्वीच ४ च्या सुमारास रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेले झाड मोठा आवाज करत कोसळले. झाडाच्या आजूबाजूला कोणीही नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
झाड पडल्याचा मोठा आवाज आल्याने आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी धावत आले. झाड पडल्याने तीन दुचाकींचे नुकसान झाले. झाडाच्या समोरील बाजूला आणि झाडाच्या बाजूला असलेली जाळी तुटली. तसेच, समोरील भिंतीलादेखील तडे गेल्याने कार्यालयाच्या समोरील भागही तुटला. झाड मुळापासून उखडून निघाले.
रस्त्याच्या मध्यभागीच झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. येण्याजाण्याचा रस्ताही बंद झाला. झाड कोसळल्याची घटना समजताच आपत्कालीन विभागाचे आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. रस्ता सुरळीत सुरू करण्यासाठी तब्बल दोन तासांहून अधिक वेळ लागला.