भीड मे यूं ना छोडो मुझे, घर लौट के भी आना पाऊ माँ

By Admin | Updated: November 15, 2016 04:41 IST2016-11-15T04:41:44+5:302016-11-15T04:41:44+5:30

‘मी पुन्हा कधीच घर सोडून जाणार नाही. पप्पा, माझी चूक झाली, मला माफ करा...’ लहानगा राहुल आपल्या वडिलांच्या कुशीत शिरून ढसाढसा रडत होता.

I do not want to go too far, I have to come back home also | भीड मे यूं ना छोडो मुझे, घर लौट के भी आना पाऊ माँ

भीड मे यूं ना छोडो मुझे, घर लौट के भी आना पाऊ माँ

ठाणे: ‘मी पुन्हा कधीच घर सोडून जाणार नाही. पप्पा, माझी चूक झाली, मला माफ करा...’ लहानगा राहुल आपल्या वडिलांच्या कुशीत शिरून ढसाढसा रडत होता. ‘आई, मला खूप शिकायचे आहे, मोठ्ठे व्हायचे आहे. आता मी तुला सोडून कुठंही जाणार नाही.’ अजय हे बोलताना आपल्या आईला बिलगला होता. घर सोडून गेलेल्या आणि आता पुन्हा घरातल्या मंडळीशी गळाभेट झालेल्या प्रत्येकाची वेगवेगळी कहाणी जो तो हुंदके देत कथन करीत होता आणि या हृदयस्पर्शी क्षणाचा साक्षीदार झाला होता टाऊन हॉल.
सभागृहात आईवडिलांना समोर आलेले पाहताच एकमेकांची दृष्टादृष्ट होताच डोळ्यांतून घळाघळा अश्रू झरू लागले. कुणी आईला घट्ट मिठी मारून झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त घेत होता, तर कुणी वडिलांच्या पायावर डोके ठेवून माफीयाचना करीत होता. काही क्षण सभागृहात नि:शब्द शांतता होती. केवळ गहिवर दाटून आला होता. मग, हळूहळू त्या आनंदाश्रूंना शब्द सापडू लागले...
आमच्या गावातील शाळा माझ्या मुलाला मान्य नव्हती. तो सारखा सैनिकी शाळेत शिकायचे आहे, असा धोशा लावत होता. काही ठिकाणी जाऊन चौकशी केली, पण तिथे ५० हजार डोनेशन सांगितले. मग, तो घरी परतला. वहिनीसोबत दवाखान्यात जाण्याकरिता घरातून बाहेर पडला. मात्र, तिला मी बिस्कीटचा पुडा घेऊन येतो, असे सांगत निघून गेला. दोन दिवस आम्ही त्याला वेडेपिसे झाल्यासारखे शोधत होतो. मात्र, तेवढ्यात या संस्थेमधून फोन आला की, तुमचा मुलगा आमच्याकडे सुखरूप आहे. माझा जीव अक्षरश: भांड्यात पडला, असे नांदेडहून आलेले चंदू गायकवाड सांगत होते. जय मला सहा ते सात वर्षांचा असताना आजारी अवस्थेत स्टेशनवर मिळाला होता. त्याला आईवडील नसल्याने मी माझे नाव दिले. त्याला आश्रमशाळेमध्ये दाखल केले होते, तेथून तो निघून आला, असे जयचे पालक उमेश चौधरी यांनी सांगितले. मला आश्रमशाळेतील वातावरण चांगले वाटत नाही, म्हणून मी तेथून पळून आल्याचे जयने सांगितले.
मला घरी परत जायचे नाही. मला घरी आवडत नाही मी संस्थेतच राहणार, असे गौतम इंगोले रडतरडत सांगत होता. घरात भावंडांची भांडणे झाली आणि रागाच्या भरात माझा मुलगा रणजित घरातून निघून गेला. त्याला रेल्वे स्टेशन, शाळा, हॉस्टेल, बसस्टॅण्ड कुठेकुठे शोधत होतो. रणजितला घरी नेले आणि तो परत निघून गेला, तर त्यापेक्षा त्याला संस्थेतच ठेवायचे ठरवले आहे, असे शिरसवडी गावातून आलेल्या शिवाजी शिंदे यांनी सांगितले. मात्र, रणजितचे मला घरीच जायचे आहे, असे आक्रंदन सुरू होते.
दीड महिन्यापूर्वी राहुल घरातून पैसे घेऊन निघून गेला. जोपर्यंत तो सुधारत नाही, तोपर्यंत मी त्याला घरी घेऊन जाणार नाही, अशी ठाम भूमिका विनोद गिरी यांनी घेतली. बाबा, मला घरी न्या, माझी चूक झाली, अशी आर्जवं करत राहुलने वडिलांच्या पायावर अक्षरश: लोटांगण घातलं. माझा मोठा मुलगा घरातून निघून गेला, तसा त्याचा धाकटा भाऊ अंथरुणाला खिळून आहे. पतीच्या निधनानंतर मी भावाकडे राहते. शेतमजुरी करते. परीक्षेला जात नव्हता म्हणून त्याला मी बडबडले. तोच राग डोक्यात घालून
तो निघून गेला. हे सांगताना डोळ्याला पदर लावलेल्या आईला पाहून अजयलाही रडू कोसळले. आईला बिलगून तो जोरजोराने रडू लागला.
कॉलेजमध्ये एकदा सर ओरडले आणि पालकांना बोलवण्याचे फर्मान काढल्याने मी घाबरून गेलो. थेट हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस पकडून मुंबईला निघून आलो, असे तेलंगणचा साईनाथ खाटरावाद सांगत होता, तर माझा मुलगा मला सुखरूप मिळाला, याचा अत्यानंद झाल्याचे त्याचे वडील नारिया सांगत होते.
‘त्या’ १६ मुलांपैकी काही आपल्या आईवडिलांसोबत निघाली. जाताना ती संस्थेतील आपल्या या सवंगड्यांचा प्रेमपूर्वक निरोप घेत होती. काहींना संस्थेतच ठेवण्याचा निर्णय मातापित्यांनी घेतला होता. त्यामुळे डबडबलेल्या डोळ्यांनी ते त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्या डोळ्यांत साठवत होते... (प्रतिनिधी)

Web Title: I do not want to go too far, I have to come back home also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.