चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST2021-09-05T04:45:59+5:302021-09-05T04:45:59+5:30

अंबरनाथ : शहरातील गायकवाड पाडा परिसरात काही दिवसांपूर्वी एका बंद घरात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. याप्रकरणी उल्हासनगर ...

The husband killed his wife on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीची हत्या

अंबरनाथ : शहरातील गायकवाड पाडा परिसरात काही दिवसांपूर्वी एका बंद घरात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. याप्रकरणी उल्हासनगर गुन्हे शाखेने तपास करून तिच्या पतीला बेड्या ठोकल्या आहेत. चारित्र्याच्या संशयावरून त्यानेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

गायकवाडपाडा परिसरातील भागूबाई चिकणकर चाळीत २२ ऑगस्ट रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाचा चेहरा जाळण्यात आल्याने तिची ओळख पटत नव्हती; मात्र उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या तपासात या महिलेचे नाव सुशिला साहेबराव निकाळजे ऊर्फ काजल असल्याचे समोर आले. २५ वर्षीय काजल ही तिचा पती सुरज आनंद खरात याच्यासोबत राहात होती; मात्र सुरज हा काजलच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद होत होते. याच वादातून त्याने तिचा लेसने गळा आवळून खून करून ओळख पटू नये, यासाठी तिचा चेहरा जाळला. यानंतर घराला कुलूप लावून तो फरार झाला.

घरातून दुर्गंधी आल्यावर प्रकार उघड

घरमालकाने घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर पोलिसांना बोलावून दरवाजा तोडला असता, हा प्रकार समोर आला. यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तर उल्हासनगर गुन्हे शाखेने याप्रकरणी समांतर तपास करून सुरजच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने पत्नी काजलच्या हत्येची कबुली दिल्याने हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

-------------------------

Web Title: The husband killed his wife on suspicion of character