वादळी वाऱ्याचा महाड तालुक्याला फटका
By Admin | Updated: October 3, 2015 23:31 IST2015-10-03T23:31:07+5:302015-10-03T23:31:07+5:30
विजांच्या कडकडाटांसह शुक्रवारी पडलेल्या वादळी पावसाचा फटका महाड तालुक्यातील वाळण बुद्रुक, वाळण खुर्द, वहूर या गावासह अनेक ठिकाणी बसला.

वादळी वाऱ्याचा महाड तालुक्याला फटका
महाड : विजांच्या कडकडाटांसह शुक्रवारी पडलेल्या वादळी पावसाचा फटका महाड तालुक्यातील वाळण बुद्रुक, वाळण खुर्द, वहूर या गावासह अनेक ठिकाणी बसला.
वाळण येथील सुमारे पन्नास घरांसह अनेक गुरांच्या गोठ्यांचीदेखील यात मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे वृत्त आहे. महसूल विभागामार्फत केलेल्या पंचनाम्यानुसार अंदाजे चार लाखांपेक्षाही अधिक नुकसान झाल्याची महसूल विभागामार्फत माहिती देण्यात आली आहे. महामार्गावरील वहूर येथेही काही घरांचे या वादळी पावसात नुकसान झाले आहे.
शुक्रवारी दुपारनंतर सुरू झालेल्या या वादळी पावसात वाळण येथील दयाराम कालगुडे, चंद्रकांत कालगुडे, संजय सुतार, भालचंद्र वखाटकर, शकुंतली पोटे, महेंद्र कालगुडे आदी पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या घरांचे तसेच गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाले.
या वादळात वाळण बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा तसेच बुद्धविहाराच्या इमारतीवरील छप्परांचे नुकसान झाले असून संपूर्ण इमारतीत मुसळधार पावसाचे पाणी साचून राहिले आहे. झालेल्या नुकसानीचे महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करण्यात येत आहेत. महाड औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांच्या छप्परांचेही या वादळात नुकसान झाले आहेत. (प्रतिनिधी)