एचएसबीसी कंपनीला ३५ हजार रुपयांचा दंड
By Admin | Updated: March 31, 2017 05:54 IST2017-03-31T05:54:40+5:302017-03-31T05:54:40+5:30
क्रेडिटकार्ड सुविधेसंदर्भात ग्राहकाला अतिरिक्त शुल्क आकारून त्रुटीची सेवा देणाऱ्या एचएसबीसी बँकिंग कंपनीला जिल्हा

एचएसबीसी कंपनीला ३५ हजार रुपयांचा दंड
ठाणे : क्रेडिटकार्ड सुविधेसंदर्भात ग्राहकाला अतिरिक्त शुल्क आकारून त्रुटीची सेवा देणाऱ्या एचएसबीसी बँकिंग कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३५ हजारांचा दंड सुनावला आहे.
डोंबिवली येथील अशोक सप्रे यांनी एचएसबीसी कंपनीकडून क्रेडिटकार्डची सुविधा घेतली होती. २००८ मध्ये कार्ड हरवल्यावर सप्रे यांनी कंपनीला कळवल्यावर त्यांना नवीन क्रेडिटकार्ड देऊन कार्डाची फी आकारली. इतर रकमेची स्टेटमेंट पाठवली. कंपनीने १०० रुपयांची मागणी केली. तर, सप्रे यांनी २०० रुपये दिल्यावरही थकीत रकमेच्या नावाखाली पैसे मागितले. पुन्हा ५०० रुपये दिल्यावर संपूर्ण रकमेची मागणी रद्द होईल, असे कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले. ते दिल्यानंतरही पुन्हा पैसे मागितले. हे सर्व त्यांनी कंपनीला सांगितल्यावरही पैशांची मागणी चालू राहिली. त्यामुळे त्यांनी कंपनीविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. तर, सप्रे यांना आणि त्यांच्या भावाला दोघांनाही कार्ड त्यांच्याच विनंतीवरून दिले होते. त्या दोन्हीचे वार्षिक शुल्क होते. मात्र, शुल्क न भरल्याने थकीत रकमेवर व्याज, दंडव्याज वाढत गेले. सप्रे यांनी केवळ ५०० रुपये दिले. फेब्रुवारी २०११ अखेरपर्यंत १२ हजार ९५३ रुपये तक्रारदारांकडून येणे होते. त्यांना अटी व शर्तींनुसार रक्कम आकारली असून त्यांची तक्रार फेटाळावी, अशी मागणी कंपनीच्या वतीने करण्यात आली.
कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता सप्रे यांनी स्वत:करिता क्रेडिट व भावासाठी अॅडआॅनकार्डची मागणी केल्याचे अर्जामध्ये दिसते. तर, अर्जावर ५० टक्के अॅन्युअल फी असा शिक्का आहे. यावरून, वार्षिक शुल्काच्या ५० टक्के रक्कम देण्याच्या अटीवर त्यांना कार्ड दिले होते. अर्जावर क्रेडिट आणि अॅडआॅनकार्डसाठी अनुक्रमे ७०० आणि ३५० रुपये नमूद आहे. ५० टक्के सवलतीच्या दराप्रमाणे त्याच्या अर्धे म्हणजे ३५० आणि १७५ रुपये मागणे आवश्यक होते. मात्र, ५० टक्के सवलत देऊनही कंपनीने सप्रे यांच्याकडे फेब्रुवारी २०११ पर्यंतचे वार्षिक शुल्क १०० टक्क्यांप्रमाणे १२९३२ रुपये मागितले. (प्रतिनिधी)
सुविधेप्रमाणे मे २००८ पर्यंत ४६४ रुपयेच सप्रे यांच्याकडून येणे होते. मात्र, १०० टक्के शुल्क आकारून कंपनीने त्यात अनेक पटीने वाढ करून नियमांचा भंग केला व सप्रे यांना त्रास दिला, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे एचएसबीसी कंपनीने सप्रे यांना नुकसानभरपाई व तक्रार खर्च मिळून ३५ हजार द्यावेत, असे आदेश मंचाने दिले आहेत.