असुरक्षितता असेल तर डॉक्टर काम कसे करतील?

By Admin | Updated: March 25, 2017 01:11 IST2017-03-25T01:11:43+5:302017-03-25T01:11:43+5:30

गेली अनेक वर्षे मूलभूत प्रश्नांकडेही दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी डॉक्टरांकडे संपाशिवाय दुसरा उपाय नव्हता आणि नाही.

How will the doctor work if there is any exposure? | असुरक्षितता असेल तर डॉक्टर काम कसे करतील?

असुरक्षितता असेल तर डॉक्टर काम कसे करतील?

स्रेहा पावसकर / ठाणे
गेली अनेक वर्षे मूलभूत प्रश्नांकडेही दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी डॉक्टरांकडे संपाशिवाय दुसरा उपाय नव्हता आणि नाही. एखादा रुग्ण दगावला की, मृत्यू नैसर्गिक असतो, हे कोणी मान्य करत नाही. डॉक्टरचीच चूक मानून नातेवाइकांकडून त्याला मारहाण होते. मात्र,जेव्हा रुग्णाला एखाद्या अवयवाची किंवा रक्ताची गरज असते, तेव्हा हेच नातेवाईक कुठे जातात, अशी असुरक्षितता असेल तर डॉक्टरांनी काम करायचे कसे, असे सवाल प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.विजय सुरासे यांनी उपस्थित केले.
डॉक्टरही माणूसच आहे आणि रुग्णसेवेचे व्रत आम्ही स्वेच्छेने स्वीकारलेले असते. ज्ञान आणि उपलब्ध साधनांच्या आधारे रुग्णाला बरे करणे आम्हाला आवडते. मात्र, डॉक्टर हे देवासारखे असले, तरी देव नाहीत. प्रत्येक व्यवसायात चांगलीवाईट माणसे आहेत. अनेकदा रुग्णाच्या वाईट सवयींमुळे झालेला आजार, चुकीमुळे झालेला अपघात मृत्यूला कारणीभूत असतो, हे अनेकजण मान्य करत नाहीत. उलट, डॉक्टर आणि त्यातही निवासी डॉक्टर यांना लक्ष्य केले जाते. निवासी डॉक्टर हे २४ तासच नव्हे, तर कधीकधी ३६ तास सलग काम करतात. एकावेळी अनेक रुग्णांचा ताण त्यांच्यावर असतो. त्यांना सुट्या नसतात. खाजगी,कौटुंबिक आयुष्य त्यांना जगता येत नाही. त्यांच्या राहण्याची योग्य सोय नसते. मात्र, डॉक्टर ही राजकारण्यांची व्होटबँक नसल्याने आमच्या या प्रश्नांकडे शासन गंभीरपणे पाहत नाही, अशा शब्दांत डॉ.सुरासे यांनी खंत व्यक्त केली.
डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबवायचे असतील, तर हॉस्पिटलमधील संवेदनशील विभागात विमानतळाप्रमाणे सुरक्षा असावी. सीआरपीएफचे जवान तैनात असावेत. सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांतील सोयीसुविधा अपग्रेड कराव्या आणि २४ तास उपलब्ध असाव्या.
डॉक्टरांची संख्या वाढण्याकरिता भरती करावी. वैद्यकीय महाविद्यालयातील सीट वाढवाव्या. तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांवर निर्बंध असावेत, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: How will the doctor work if there is any exposure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.