नोटाबंदीनंतर वाढणार घर आणि गाडीखरेदीचा ट्रेण्ड
By Admin | Updated: March 27, 2017 05:47 IST2017-03-27T05:47:28+5:302017-03-27T05:47:28+5:30
नोटाबंदीनंतर गुढीपाडव्याच्या निमित्ताने घर आणि गाडीखरेदीचा ट्रेण्ड वाढण्याची शक्यता आहे. तसेच इतर खरेदीही वाढण्याची शक्यत आहे.

नोटाबंदीनंतर वाढणार घर आणि गाडीखरेदीचा ट्रेण्ड
झेंडूच खाऊन जातो भाव
गुढीपाडव्याला पूजेसाठी विविध फुले वापरली जातात. दारावर साध्या फुलांपासून ते अगदी फुलांचे तोरण लावले जाते. त्यामुळे फुलांचा बाजार तेजीत असतो. ही तेजी पाडव्याच्या आदल्या दिवशी बाजारात जरा जास्तच असते. विविध फुलांमध्ये झेंडूच भाव खाऊन जातो.
कल्याणच्या फुल मार्केटमधील विक्रेते बबन डोंगरे यांनी सांगितले की, गुढीपाडव्याला ४० ते ५० गाड्या झेंडू येतो. एका गाडीत १५०० किलो झेंडू असतो. पाडव्याला ४० ते ५० रुपये किलो भाव होईल. झेंडू जुन्नर, नगर, संगमनेर, नाशिक, अकोला, आळेफाटा, बेल्हे, वाडा, उस्मानबाद, बीड, मोखाडा येथून येतो. झेंडूसोबत अष्टर, मोगरा, बिजली, लीली, गुलछडी, कागडा, गुलाब या फुलांनाही मागणी असते. तोरणांमध्ये या फुलांचाही झेंडूसोबत वापर होतो. कडुनिंबाला बाराही महिने मागणी असते.
कडुनिंबाचे विक्रेते प्रदीप गुप्ता यांनी सांगितले की, हाजीमलंग, मुरबाड येथून कडुनिंब येतो. दोन रुपयांना मिळणारी जुडी पाडव्याला ५ ते २० रुपये होते. एरव्ही, ५ ते १० हजार जुड्या येत असतील, तर सणाला ६० हजार जुड्या येतात. आंब्याची पाने १५०० ते २००० जुड्या विकली जातात. मुरबाड, भुसावळ येथूनही कडुनिंबाचा पाला येतो. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले की, सध्या पिवळा व लाल झेंडू १ टन येत आहे. पाडव्याला १२० रुपये किलो होईल, असे ते म्हणाले. पाडव्याला साधारण ५० लाखांच्या फुलांची उलाढाल होते, असे घोडविंदे म्हणाले.
डबल धागा गाठींचा ट्रेण्ड
साखरगाठी तयार करणारे व्यापारी विनायक खंडेलवाल यांनी सांगितले की, पूर्वी सिंगल धाग्यात गाठी बांधल्या जात होत्या. आता डबल धाग्यात गाठी बांधल्या जातात. डबल धाग्यातील गाठी दिसायला सुंदर दिसतात. या साखरगाठी घेण्याचा एक नवा ट्रेण्ड बाजारात आला आहे. ही पद्धत दोन वर्षांपूर्वी बाजारात आली. पण, आम्ही यंदा प्रथमच ही पद्धत वापरत आहोत. यंदा तीन हजार किलोची मागणी आहे. किलोला १२० रुपये भाव असून त्यात १८ गाठी येतात. मागील वर्षीपेक्षा यंदा मागणी थोडी कमी झाली आहे. आता गाठी फार खाल्ल्या जात नाही. साखरेच्या किमतीत वाढ झाल्याने १० रुपयांनी दरवाढ झाली आहे. आता फक्त ठाणे जिल्ह्यात एकच कारखाना आहे, असे खंडेलवाल म्हणाले.
गुढीही झाली आधुनिक
पूर्वीच्या काळी घरे मोठी असल्याने गुढी उभारण्यासाठी भरपूर जागा असायची. मात्र, आज घरे लहान झाली. फारशी जागाही नसते. अर्थात, अशाही परिस्थितीत गुढी उभारली जाते. पण, ज्यांना शक्य नाही, ते नॅनो गुढी आणतात. ही नॅनो गुढी डोंबिवलीच्या स्वाती जोशी तयार करतात. तसेच सौरऊर्जेवर चालणारी गुढीही जोशी यांनी तयार केली आहे. जोशी यांनी सौरऊर्जा पॅनल कमळाच्या आकाराचे किंवा चौकोनी वापरून गुढी तयार केली आहे. ही गुढी ३६० अंशांत फिरते. नावीन्य म्हणून जास्त मागणी आहे. सोलर पॅनलला छोट्या पट्ट्या लावल्या जातात. काठीऐवजी अॅल्युमिनियम किंवा स्टीलचा रॉड वापरला जातो. सिल्व्हर कोटेड गडू लावला जातो. या गुढीची किंमत ५०० रुपये असून साधी गुढी १५० रुपये आहे. पॅनल कमी असल्याने यंदा २५ ते ३० आॅर्डर आल्या आहेत. अजून आॅर्डर येतील, असे जोशी म्हणाल्या.
साध्या गुढीच्या १५० आॅर्डर आहेत. मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी, म्हणून छोटी गुढी देव्हाऱ्यात ठेवली जाते. जोशी या मूळच्या नाशिकच्या आहेत. वडील, भाऊ, काका हे सगळे शिल्पकार असल्याने घरातूनच क लेचा वारसा मिळाला आहे. मागील वर्षी २७५ सोलर गुढ्या विकल्या. यंदा त्यापेक्षा अधिक गुढ्या विकण्याचा मानस असल्याचे जोशी यांनी सांगितले.
कल्याणहून नॅनो गुढ्या सातासमुद्रापार
कल्याणमध्ये राहणाऱ्या मेधा आघारकर १३ वर्षांपासून मिनीगुढी तयार करण्याचे काम करत आहेत. आज अनेक ठिकाणी मिनीगुढ्या तयार केल्या जातात. आघारकर यांच्या गुढ्या सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत. यंदाच्या वर्षी त्यांनी ४ ते ५ हजार गुढ्या तयार केल्या आहेत. या सगळ्यांची विक्री झाली असून आता पुन्हा नव्याने गुढ्या तयार कराव्या लागणार आहेत. चौरंगाची गुढी गेल्या चार ते पाच वर्षांपासून बनवत आहे. पण, ही गुढी यंदा अमेरिकेत गेली आहे. एका कुरिअर सर्व्हिसने आपल्या ग्राहकांना गुढ्या भेट म्हणून दिल्या असून त्यासाठी ५० गुढ्यांची खरेदी केली आहे. बडोद्यातील प्रसाद पटवर्धन यांनी साखरपुड्यात आपल्या व्याहींना देण्यासाठी ५० गुढ्या खरेदी केल्या आहेत. व्याही इंदूरला राहतात. १० पासून ते २० इंचांपर्यंतच्या गुढ्या येथे उपलब्ध आहेत. या गुढ्या अनुक्रमे १५० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा १० टक्के किमतीत वाढ झाली आहे. आघारकर या मूळच्या ग्वाल्हेरच्या असून आपली संस्कृती जपण्यासाठी त्या गुढ्यांचा व्यवसाय करीत आहे. त्यांना या कामात १० महिला मदत करतात. माझा कोणताही बचत गट नाही, पण यामुळे महिलांना रोजगार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमरस अजून महागच...
पाडव्याला हमखास घरात गोडधोड केले जाते. चैत्र पाडवा असल्याने होळी झाली की, बाजारात आंब्याची आवक सुरू होते. पाडव्याला आमरस पुरीचा बेत असतो. यंदाच्या पाडव्याला आमरसाची गोडी चाखता येईल. मात्र, खिशाला थोडा जास्त भुर्दंड पडणार आहे. कारण, पाडव्याला बाजारात आलेला आंबा जरा महागच असतो.
गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक वाढत असल्याने कि मतीत घट पाहायला मिळेल. यंदा आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे गुढीपाडव्यानंतर किंमत कमी होईल. उत्तम प्रतीच्या आंब्याचा भाव खाली घसरून तो १२० ते १२५ रु. डझन होईल. सध्या देवगडचा आंबा बाजारात येणार असून १० गाड्या येत आहे. गुढीपाडव्यापासून ५० ते ६० गाड्या येतील, अशी माहिती आंबाविक्रेते सोनावळे, पाटकर यांनी दिली.
घराबरोबर गाडी आणि सोनेही
गुढीपाडव्याला नवीन घराची खरेदी किंवा नवीन घरात राहायला जाणे, हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने अनेक बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना विविध आॅफर्स देऊन मदत करतात.
यंदा नोटाबंदीचे बाजारपेठेवर सहा महिने जे परिणाम झाले, त्यातून बाहेर पडलेले लोक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात घरखरेदीचा बेत आखतील, अशी अपेक्षा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नातू-परांजपे डेव्हलपर्सचे समीर नातू यांनी व्यक्त केली आहे. हेच ओळखून अनेक डेव्हलपर्स, कन्स्ट्रक्शन कंपन्यांनी यंदा विविध आॅफर्स ग्राहकांना देऊ केल्या आहेत. त्यातही घराची मूळ रक्कम भरल्यावर ग्राहकाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन डेव्हलपर्सकडून मोफत करून दिले जाते. तसेच साधारण दीड ते दोन कोटींच्या फ्लॅटवर गाडी मोफत देण्याच्या आॅफर्स यंदा दिसत आहेत. साधारण एक कोटीच्या पुढील फ्लॅटवर काही ग्रॅम सोने मोफत, अशाही स्कीम ग्राहकांना आकर्षित करत आहेत. तसेच ज्या ग्राहकांना पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन फ्लॅटमध्ये राहायला जाण्याची इच्छा असते, अशांसाठी फ्लॅट बुकिंगवर संपूर्ण फर्निश किचन अशी स्कीम आहे. मोफतच्या स्कीम यंदाही बाजारात असून त्याला ग्राहकांची नेहमीप्रमाणे पसंती आहे, असेही नातू म्हणाले. मुळातच गुढीपाडवा मराठी लोकांबरोबरच इतर जातीधर्मांतील लोकांसाठीही शुभ मानला जातो. त्यामुळे ठाण्यातील विविध बांधकाम व्यावसायिक याचा फायदा घेत अनेक आॅफर्स घेऊन बाजारात येतात. या स्कीम साधारण गुढीपाडव्याच्या आठ दिवस आधीपासून सुरू होतात आणि पाडव्यानंतर चैेत्र नवरात्रोत्सवापर्यंत सुरू असतात. बाजारपेठेत साधारण ७०-८० टक्के डेव्हलपर्स अशा विविध स्कीम ग्राहकांसाठी देतात, असेही नातू यांनी सांगितले.
वाहनांसाठी लो डाउन पेमेंट
पाडव्याचा मुहूर्त साधत दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी करण्याकडेही अनेकांचा कल असतो. वाहने घेण्याचा विचार मनात असला तरी पाडव्याचा मुहूर्त साधला जातो. कारण, पाडव्याच्या निमित्ताने वाहनांच्या खरेदीवरही अनेक स्कीम दिल्या जातात. यंदा पाडव्याच्या निमित्ताने मोठ्या वाहनांच्या खरेदीवर फायनान्स स्कीमच अनेक दुकानदारांनी ग्राहकांना आॅफर केल्या आहेत. लो डाउन पेमेंट आणि लो रेट आॅफ इंटरेस्ट या दोन प्रमुख स्कीम आहेत. तर गाड्यांच्या किमतीही अधिक असल्याने ग्राहकांना या स्कीम परवडतात. पूर्वी ग्राहकांना डाउन पेमेंट वेगळे आणि गाडीच्या एकूण किमतीत नंतर वेगळे डिस्काउंट दिले जायचे. मात्र आता लो डाउन पेमेंट स्कीममध्ये ग्राहकांना सुरूवातीलाच डाउन पेमेंट भरताना त्या रकमेतून डिस्काउंटची रक्कमही कमी केली जाते. त्यामुळे साहजिकच डाउन पेमेंटची रक्कम कमी झाल्याने ग्राहकांवरील एकदम येणारा ताण कमी होतो. आणि त्यामुळे ग्राहकांनाही ही स्कीम फायदेशीर ठरते. तर लो रेट आॅफ इंटरेस्ट या स्कीममध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या बँका किंवा दुकानांचे खाजगी फायनान्सही लोन देत असल्याने ग्राहकांना एवढी मोठी रक्कम भरणे सुलभ होते. साधारण ३.९९ ते ७.९९ इतके रेट आॅफ इंटरेस्ट सध्या दिले जात आहे, अशी माहिती रितूनिसानचे ठाणे मार्केटिंग ग्रुप हेड गौरव रावत यांनी दिली. तसेच ६ किंवा ८ महिने फ्री सर्व्हिसचीही स्कीम असते. तर दुचाकींवर विविध अॅक्सेसरिज फ्री दिल्या जातात. गुढीपाडव्याच्या साधारण १५-२० दिवस या विविध स्कीम सुरू होतात, असेही ते म्हणाले.