उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय कोरोनाचे हॉटस्पॉट, संशयीतासह इतर रुग्णाचे एकाच ठिकाणी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 17:23 IST2020-06-29T17:23:35+5:302020-06-29T17:23:44+5:30
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय गेल्या काही दिवसापासून चर्चेत आले असून रुग्णाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह २१ पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय कोरोनाचे हॉटस्पॉट, संशयीतासह इतर रुग्णाचे एकाच ठिकाणी उपचार
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, ग्रामीण परिसर, अंबरनाथ व बदलापुर आदी ठिकाणाहून दररोज शेकडो रुग्ण मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी येतात. या रुग्णांवर ज्या जनरल वॉर्डांत उपचार होतो, त्यातील अनेकांचे रिपोर्ट कोरोना पोझीटीव्ह येत असल्याने रुग्णालय कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याची टीका चोहोबाजूंनी होत आहे.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय गेल्या काही दिवसापासून चर्चेत आले असून रुग्णाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह २१ पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, ग्रामीण भागातून विविध आजाराने ग्रस्त असलेली शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येतात. यामध्ये कोरोनाचे लक्षण असलेल्या रुग्णाचा समावेश असतो. मात्र जोपर्यंत त्या रुग्णाचा स्वाब अहवाल पोझीटीव्ह येत नाही. तोपर्यंत त्याच्यावर इतर रुग्णाच्या सोबत डॉक्टरांना उपचार करावा लागतो. अश्या अनेक रुग्णाचा अहवाल आतापर्यंत पोझीटीव्ह आल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ जाफर तडवी यांनी दिली असून या प्रकारामुळे संसर्ग वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. हा प्रकार टाळण्यासाठी व सर्वच रुग्णांना उपचार मिळण्यासाठी वेगळ्या रुग्णालय व विशेष वॉर्डाची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शहरातील हृदयरोग, दमा, सर्दी, ताप, व्हायरल इन्फेक्शन आदी रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन डॉक्टरासह शासकीय व खाजगी रुग्णालयाचा बदलला असल्याचे चित्र शहरात आहे. कोरोनाच्या भीतीने व स्वाब अहवाल येई पर्यंत त्यांना योग्य उपचार मिळत नाही. कोरोना पेक्षा इतर रोगाने उपचारविना रुग्ण मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला. राज्य शासन व महापालिका प्रशासन यातून धडा घेणार की नाही? असा प्रश्न रगडे यांनी केला. कोरोना संशयित रुग्णांवर स्वाब येण्याची वाट न पाहता कोणत्याही रुग्णालयात तातडीने उपचार व्हावे. अशी मागणी आहे. तसेच सर्वच रुग्णांना उपचार मिळण्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा राज्य शासनसह महापालिका प्रशासनाला दिला आहे.
शहर लॉकडाऊन करण्याची मागणी
शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर शहरात काही दिवस कडक लॉकडाऊन करण्याची मागणी मनसेसह ओमी टीम व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे.