पिसवली शाळेत वाईट विचारांची होळी
By Admin | Updated: March 12, 2017 02:42 IST2017-03-12T02:42:49+5:302017-03-12T02:42:49+5:30
स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रद्धा, वृक्षतोड, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, रासायनिक रंगांचा वापर याबरोबरच शिक्षकांना उलट बोलणे, खोड्या काढणे, फुगे फोडणे, गैरहजर राहणे

पिसवली शाळेत वाईट विचारांची होळी
डोंबिवली : स्त्रीभ्रूण हत्या, अंधश्रद्धा, वृक्षतोड, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, रासायनिक रंगांचा वापर याबरोबरच शिक्षकांना उलट बोलणे, खोड्या काढणे, फुगे फोडणे, गैरहजर राहणे, अशा वाईट विचारांची होळी शनिवारी कल्याणनजीकच्या पिसवली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आली.
विद्यार्थ्यांना होळीचे महत्त्व सांगताना चांगल्या-वाईट गोष्टी पटवून देण्यात आल्या. वाईट गोष्टी, विचार, सवयी त्यांना विचारून त्याच्या पताका बनवून त्या होळीला गुंडाळण्यात आल्या. तत्पूर्वी आजूबाजूचा कचरा गोळा क रून त्याची होळी तयार करण्यात आली होती. गावचे उपसरपंच प्रल्हाद भोईर, शाळा सुधार समिती अध्यक्ष विलास भोईर, सुनील भोईर यांच्या उपस्थितीत मुलींच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. हा उपक्रम या शाळेत १० वर्षांपासून राबवला जात आहे.
शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी होळी सणाची सांगड विज्ञानाशी घालून मुलांना माहिती दिली. शर्मिला गायकवाड यांनी होळीकेची कथा मुलांना सांगितले. महेंद्र अढांगळे यांनी नैसर्गिक रंग तयार करून तेच वापरावेत तर सरिता काळे यांनी फुगे, पिशव्या वापरू नयेत, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
विलास भोईर यांनी गावागावात साजऱ्या होणाऱ्या होळीपेक्षा पिसवली शाळेतील होळी-आगळी वेगळी आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा,’ असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. विस्तार अधिकारी प्रेरणा नेवगी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान, शहरी भागातील शाळांमधूनही अशा प्रकारचे उपक्रम राबविले गेल्यास विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणासंदर्भात जनजागृती होऊ शकेल असा सूर आळवण्यात आला. (प्रतिनिधी)
नैसर्गिकरित्या होळी खेळण्याची शपथ
अजय पाटील यांनी नैसर्गिकरित्या होळी खेळण्याची शपथ मुलांना दिली. त्यानंतर नैसर्गिकपणे तयार केलेल्या कोरड्या रंगांनी धुळवड साजरी करून मुलांनी शिक्षक व ग्रामस्थांसह होळीचा आनंद लुटला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये सकारत्मक बदल झाला आहे, असे मुख्याध्यापक पाटील यांनी सांगितले.