माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक १४२२ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:43+5:302021-03-21T04:39:43+5:30
ठाणे : गेल्या १९ दिवसांत ठाण्यात कोरोनाचे तब्बल ५,८८० नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत शहरात कोरोनाचे ६९ हजार ...

माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक १४२२ कोरोना रुग्ण
ठाणे : गेल्या १९ दिवसांत ठाण्यात कोरोनाचे तब्बल ५,८८० नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत शहरात कोरोनाचे ६९ हजार ३३२ रुग्ण आढळले असून त्यातील ६३ हजार ७९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु मागील काही दिवसांत माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत कोरोनाचे सर्वाधिक १,४२२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेने येथील रुग्णवाढीच्या कारणांवर लक्ष केंद्रित केले आहे.
महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने महापालिकेने ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे जाहीर केले. याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. मार्च महिन्यात अवघ्या १९ दिवसांत शहरात कोरोनाचे नवे ५,८८० रुग्ण वाढल्याने ठाणेकरांची चिंता वाढली आहे. सध्या प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३,६२८ एवढी आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्क्यांवरून ९३ टक्क्यांवर आले आहे.
दरम्यान, याच काळात सर्वाधिक १,४२२ रुग्ण हे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत आढळले. येथील झोपडपट्ट्यांत रुग्ण वाढताना दिसत नसून सोसायट्यांमध्ये वाढताना दिसत आहे. घोडबंदर भागात अनेक मोठमोठी गृहसंकुले आहेत. या ठिकाणी बाहेरगावी नोकरीनिमित्त जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. तसेच मागील काही महिने येथील रहिवासी घराबाहेर पडले नव्हते. परंतु आता ते मोठ्या संख्येने घराबाहेर पडताना दिसत आहेत. मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकच्या निमित्ताने रस्त्यांवर गर्दी दिसत आहे. बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या तोंडाला मास्क दिसत नाही. त्यामुळेच या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. रुग्ण वाढत असले तरी घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
दरम्यान, माजिवडा मानपाडापाठोपाठ नौपाडा - कोपरी प्रभाग समितीच्या हद्दीत गेल्या १९ दिवसांच्या कालावधीत ८०२, वर्तकनगर ७१०, उथळसर ५५९, कळवा ५५५, लोकमान्य सावरकरनगर ३८१, वागळे ३६२, दिवा २१० आणि मुंब्रामध्ये १३० नवे रुग्ण आढळून आले आहेत.
........
वाचली.