इथे होते लाचखोरांचे‘कल्याण’

By Admin | Updated: November 14, 2016 03:57 IST2016-11-14T03:57:14+5:302016-11-14T03:57:14+5:30

वाढत्या लाचखोरीच्या प्रकरणांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका चांगलीच चर्चेत आली आहे. लाच घेताना आॅक्टोबरमध्ये भाजपा नगरसेवक गणेश भाने

Here was the bribe's 'welfare' | इथे होते लाचखोरांचे‘कल्याण’

इथे होते लाचखोरांचे‘कल्याण’

वाढत्या लाचखोरीच्या प्रकरणांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका चांगलीच चर्चेत आली आहे. लाच घेताना आॅक्टोबरमध्ये भाजपा नगरसेवक गणेश भाने यांना अटक झाली होती. त्यापाठोपाठ आता सहायक आयुक्त व तत्कालीन ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे हेही अशाच एका प्रकरणात अडकले गेले. विशेष म्हणजे, लाचखोर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांना कालांतराने पुन्हा सेवेत घेऊन मानाची पदे देण्यात आली. त्यामुळे इथे लाचखोरांचे ‘कल्याण’ होत आहे.
केडीएमसीत दोन दशकांत लाचखोरी बोकाळल्याचे चित्र आहे. उपायुक्त आणि सहायक आयुक्त, अधिकारी वारंवार पकडले जात आहेत. त्यातून त्यांचे लाचेचे व्यसन सुटत नसल्याचे स्पष्ट होत आहे. बेकायदा बांधकाम असो अथवा नूतनीकरण, कामाचे कार्यादेश देणे असो अथवा कंत्राटदारांची बिले मंजूर करणे... अशा विविध कारणांनी लाच मागून अमाप काळी माया जमा करणाऱ्यांनी महापालिकेच्या विकासाऐवजी स्वत:चाच विकास साधण्यात धन्यता मानली आहे.
लाचखोरांना कडक शासन करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संगनमताने होत आहे. बोराडे व उपायुक्त सुरेश पवार हे याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. या ‘अभय’ देण्याच्या प्रवृत्तीमुळेच सध्या लाचखोर प्रकरणातील बहुतांश अधिकारी महापालिकेत ‘कार्यकारी’ अशा महत्त्वाच्या पदावर आहेत. त्यांना आता कोणतेही भय राहिलेले नाही. फेब्रुवारी २०१४ मध्ये बेकायदा बांधकामांवरील कारवाई टाळण्यासाठी बोराडे यांनी तीन लाखांची लाच मागितली होती. त्या वेळी त्यांच्यासह त्यांचा खाजगी वाहनचालक कय्युम चांद पाशा शेख यालाही अटक झाली होती. आता त्यांना दुसऱ्यांदा अटक झाली आहे.
जाहिरातीच्या प्रकरणात लाच घेताना अटक झालेले उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे सध्या बेकायदा फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकासह अन्य महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार आहे. सहायक संचालक नगररचनाकार म्हणून कार्यरत असतानाही लाचखोरीप्रकरणी अटक झालेल्या कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांच्याकडे प्रकल्प तसेच बीएसयूपी प्रकल्पाची जबाबदारी आहे. बीएसयूपी प्रकल्प नेहमीच वादग्रस्त ठरला. तसेच घोटाळ्याचे आरोपही झाले. लाच प्रकरणात अटक झालेले आणखी एक प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते हे सध्या ‘ब’ प्रभाग क्षेत्र अधिकारी आहेत, तर ‘क’ प्रभागात प्रभागक्षेत्र अधिकारी असताना लाच प्रकरणात अटक झालेल्या बोराडे यांच्याकडे पुन्हा ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारीपदाचा पदभार होता. त्यांचे लाचेचे व्यसन न सुटल्याने ते पुन्हा या जाळ्यात अडकले गेले. शहर अभियंता पी.के. उगले आणि कार्यकारी अभियंता दीपक भोसले हे एका कंत्राटदाराकडून पैसे स्वीकारत असल्याबाबतची चित्रफीत जुलैमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यातच, महापालिका मुख्यालयाच्या नागरिक सुविधा केंद्रातील विजय रतन बनसोडे या लिपिकाला १२०० रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक झाली. आता भाने आणि बोराडे यांच्या लाचखोरीच्या प्रकरणांनी आणखी त्यात भर पडली आहे.
महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबरोबरच दोन वर्षांत केडीएमसीच्या दोन नगरसेवकांनाही लाच प्रकरणात अटक झाली आहे. आॅक्टोबरमध्ये गणेश भाने प्रकरण गाजले. त्याआधी मागील लोकप्रतिनिधींच्या राजवटीतील शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक विद्याधर भोईर यांना लाच प्रकरणात अटक झाली होती. यातून अशा प्रकरणात लोकप्रतिनिधींचाही सहभाग आता वाढत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Here was the bribe's 'welfare'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.