‘त्या’ रहिवाशांना मिळणार साहाय्य
By Admin | Updated: August 10, 2015 23:36 IST2015-08-10T23:36:48+5:302015-08-10T23:36:48+5:30
ठाकुर्लीत मातृकृपा इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील रहिवाशांना मुख्यमंत्री अर्थसाहाय्य करणार असून त्यासंदर्भातील घोषणा ते लवकरच करतील, अशी माहिती भाजपाचे नगरसेवक श्रीकर

‘त्या’ रहिवाशांना मिळणार साहाय्य
डोंबिवली : ठाकुर्लीत मातृकृपा इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील रहिवाशांना मुख्यमंत्री अर्थसाहाय्य करणार असून त्यासंदर्भातील घोषणा ते लवकरच करतील, अशी माहिती भाजपाचे नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी दिली. शुक्रवारी संध्याकाळी ४.१५ ला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेत जखमींसह मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, असे साकडे घातले.
चौधरींचे निवेदन घेत ते म्हणाले की, यासंदर्भात अधिवेशन काळात आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व माहिती मिळाली. आगामी काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी तातडीच्या स्वरूपात उपाययोजनाही करण्यात येतील. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी होती. त्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. लवकरच त्याबाबतची घोषणा करण्यात येईल. ते अर्थसाहाय्य किती असेल, याबाबतची माहिती मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली नसल्याचे सांगण्यात आले.
सर्व निकष तपासून योग्य ती मदत निश्चित केली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या ती बाधित कुटुंबे कोठे राहत आहेत, याबाबतची माहिती विचारल्यावर चौधरी यांनी गेल्या आठवडाभरातील त्यांनी व नागरिकांनी केलेल्या मदतकार्यासंदर्भात माहिती दिली. घटना घडल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेतील नानासाहेब धर्माधिकारी हॉलमध्ये काहींना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. मात्र, तो हॉल सामाजिक कार्यासाठी आधीपासूनच देण्यात येत असून त्यासंदर्भातील तारखाही बुक झाल्या होत्या.
परिणामी, तेथे एक मंगलकार्य असल्याने तेथून त्या रहिवाशांना महापालिकेच्या निवारा केंद्रात हलविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व कालावधीत होईल तेवढ्या सर्व सोयी महापालिकेने देण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)
चौधरी यांनी गुरुवारी महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांचीही भेट घेतली. ठाण्याप्रमाणे या ठिकाणी पडलेल्या इमारतीमधून रहिवाशांचे दस्तऐवज शोधून काढण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच ते सर्व ओळख पटवल्यावर संबंधितांना देण्यासंदर्भात चर्चा केली, रवींद्रन यांनीही तातडीने यासंदर्भात उपायुक्यांसह संबंधितांना याबाबतच्या सूचना दिल्याचेही ते म्हणाले. लवकरच ते काम हाती घेण्यात येईल. त्यातून जे साहित्य मिळेल, ते जाहीर करण्यात येईल. संबंधितांना ते तत्काळ देण्यात येईल, असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला.