रिक्षावाल्यांबरोबर पोलिसांनाही कर्तव्याची जाणीव क रून द्या
By Admin | Updated: September 23, 2015 03:59 IST2015-09-23T03:59:30+5:302015-09-23T03:59:30+5:30
‘रिक्षावाल्यांना कर्तव्याची जाणीव कर’ या ‘लोकमत’च्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ चळवळीत ठाणेकरांचा सहभाग मेसेज्च्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढत आहे.

रिक्षावाल्यांबरोबर पोलिसांनाही कर्तव्याची जाणीव क रून द्या
पंकज रोडेकर , ठाणे
‘रिक्षावाल्यांना कर्तव्याची जाणीव कर’ या ‘लोकमत’च्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ चळवळीत ठाणेकरांचा सहभाग मेसेज्च्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढत आहे. या मेसेज्मधून आता नवनवीन बाबी पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामध्ये रिक्षावाल्यांबरोबर पोलिसांनाही त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर या आपल्या खात्यातील पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणार का? असा सवाल ठाणेकरांकडून विचारला जात आहे.
आवाजाचे प्रदूषण, रिक्षाचालकांना कर्तव्याची जाणीव अशा विविध समस्या घेऊन लोकमतने ही चळवळ उभी केली आहे. त्याला दिवसेंदिवस चांगलेच यश लाभल्याचे दिसते आहे. अनेकजण लोकमतच्या मोहिमेचे कौतुक करून त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील रिक्षाचालकांना त्यांच्या कर्तव्याची जाण करून देण्यासाठी लोकमतने दिलेल्या व्हॉट्सअॅपच्या नंबरवर मेसेज वाढत असतानाच, रिक्षाचालकांकडून येणारे वेगवेगळे अनुभव शेअर केले जात आहेत. काही रिक्षाचालकांनी थेट संपर्क साधून त्यांची बाजू मांडली आहे. भाडे का नाकारले किंवा त्याने रिक्षा का थांबवली नाही याची चौकशी करावी कारण त्यांनाही घरची कामे करावी लागतात. असेही काही मेसेज लोकमतने दिलेल्या नंबरवर आले आहेत. विशेष म्हणजे रिक्षावाल्यांमध्ये कर्तव्याची जाणीव जागृत करायलाच पाहिजे असे ठाम सांगणारेही मेसेज येत आहेत. पण त्या आधी पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देणे अधिक गरजेचे आहे.
सोमवारी दुपारी ३ चा सुमार... तीन हात नाक्यावरून मुलुंड चेकनाक्याकडे जाणारा रस्ता तसा मोकळा.... मुलुंड चेकनाक्याच्या अलिकडे ट्रक थांबलेले... अपघात होईल अशी अजिबात परिस्थिती नाही. असे असताना तीन हात नाक्याकडून मुलुंड चेकनाक्याच्या दिशेने जाणारी रिक्षा अचानक डाव्या बाजूला वळली आणि तिथे उभ्या असलेल्या ट्रकच्या मागच्या कोपऱ्यावर धडकली. रिक्षाची काच फुटली आणि चालकाच्या बाजूला म्हणजेच चौथ्या सीटवर बसलेला प्रवासी रिक्षाचा पत्रा आणि रॉडमध्ये अडकला. त्या प्रवाशाला बाहेर काढले तेव्हा त्याची शुद्ध हरपली होती. मागच्या सीटवर त्याची नातेवाईक तिच्या दोन लहान मुलांसह बसली होती. तिच्याही नाकातून रक्त वाहत होते. या सगळ््या प्रकारात रिक्षावाल्याने पोबारा केला. तिथे जमलेल्यांनी त्या बेशद्धावस्थेतील माणसाला दुसऱ्या रिक्षात बसवून रुग्णालयाच्या दिशेने पाठवून दिले. रिक्षावाल्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला, पण त्याची शिक्षा चौथ्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला भोगावी लागली. चौथा प्रवासी बसविणे बेकायदा असूनही ठाण्यात वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू आहे. वाहतूक पोलीसही याकडे काणाडोळा करतात. प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार हाच प्रश्न लोकमतच्या ‘काहीतर कर ठाणेकर’ मोहिमेअंतर्गत रिक्षा चालक, संघटना आणि वाहतूक पोलिसांसह आरटीओलादेखील आहे.
अनुभवाचे कथन करताना, आलेल्या एका मेसेजमध्ये गावदेवी जवळ मीटरवाली रिक्षा पकडली. ती नितीन कंपनीकडे निघाली असताना तेवढ्यात एका हवालदाराने त्या रिक्षावाल्याला थांबवून त्याचा डायरेक्ट प्रवासी बसविण्याचा परवाना घेतला आहे का असा प्रश्न विचारला. मात्र, त्याने तिथून भाडे घेतले म्हणून किंवा इथून भाडे घ्यायला परमिशन नाही हे माहिती असतानाही त्याची अडवणूक केलीच शिवाय त्या प्रवाशालाही उतरवून दिले. यामुळे या रिक्षाचालकांनी काय करावे असाच सवाल मेसेजद्वारे विचारला जात आहे.
आपल्याला आलेले रिक्षाचालकांचे अनुभव कथन करण्यासाठी आणि आपल्या तक्रारी करण्यासाठी ९८६९४४८३९१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर रिक्षा नंबरप्लेटच्या फोटोसह पाठवा. तसेच काहीतरी कर ठाणेकर या फेसबुक पेजवरही आपण तक्रारी नोंदवू शकता. तक्रारीची दखल आम्ही घेऊ आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी, आम्ही आपली तक्रार रिक्षा युनियन तसेच वाहतूक पोलीस आणि ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवू.