मूर्तीच्या उंचीचेच विघ्न

By Admin | Updated: August 31, 2016 03:12 IST2016-08-31T03:12:29+5:302016-08-31T03:12:29+5:30

मुंबईप्रमाणे उंचीचा आग्रह धरत ठाणे जिल्ह्यातील गणेश मंडळांनी भव्य मूर्ती आणण्यास सुरूवात केली

The height of the idol is disturbing | मूर्तीच्या उंचीचेच विघ्न

मूर्तीच्या उंचीचेच विघ्न

ठाणे, उल्हासनगर : मुंबईप्रमाणे उंचीचा आग्रह धरत ठाणे जिल्ह्यातील गणेश मंडळांनी भव्य मूर्ती आणण्यास सुरूवात केली असली तरी त्याची कल्पना पोलीस, वीज कंपनीचे अधिकारी यांना न दिल्याने आणि मुंबईप्रमाणे वीज वाहिन्या भूमिगत नसल्याने उल्हासनगरची दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
केवळ उल्हासनगरच नव्हे, तर ठाण्यातील मुंब्रा-दिव्याचा परिसर, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदालपूर, भिवंडी, मीरा-भाईंदर या परिसरातही वीज वाहिन्या, केबल, खासगी ब्रॉडबँड कंपन्यांच्या वायरींचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. त्यामुळे उंच मूर्ती नेताना त्यात अडकतात. झाडाच्या फांद्या, वायर ओरबाडल्या जातात. मूर्तीसोबत बसलेले कार्यकर्ते हाती काठ्या घेऊन या वायरी उचलून धरतात. पण त्याचवेळी खड्डे आले तर मूर्ती डुगडुगते.
अशावेळी मूर्तीकडे अधिक लक्ष द्यावे लागते. पाऊस सुरू असेल तर विजेचा धक्का बसण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मंडळांनी उंच मूर्ती नेताना पोलीस, वीज कंपनी, पालिकेला कल्पना द्यायला हवी. मात्र त्या नियमाची सक्ती नसल्याने आणि या यंत्रणाही त्याकडे गांभीर्याने पाहात नसल्यानेच दुर्घटना घडल्याचे दिसते.
श्रद्धेचा विषय असल्याने पालिकासह इतर विभाग मूतीच्या उंचीला आक्षेप घेत नाहीत. मात्र मंडळांनी परवानगी घेतनाच मूर्तीच्या उंचीची माहिती पालिकेला देणे यापुढे बंधनकारक करणार असल्याचे उल्हासनगरच्या आयुक्तांनी सांगितले असले, तरी अन्य पालिकांत तशी सक्ती नाही. मंडपाच्या उंचीप्रमाणेच हे बंधनही काटेकोर पाळले तर कार्यकर्त्यांचा जीव वाचू शकेल. (प्रतिनिधी)

Web Title: The height of the idol is disturbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.