अतिवृष्टीचा कल्याण एसटी डेपोलाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST2021-07-27T04:41:41+5:302021-07-27T04:41:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोकण, सांगली, कोल्हापूर भागात झालेल्या पूरस्थितीमुळे प्रामुख्याने अन्य घटकांप्रमाणेच राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोलाही ...

अतिवृष्टीचा कल्याण एसटी डेपोलाही फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोकण, सांगली, कोल्हापूर भागात झालेल्या पूरस्थितीमुळे प्रामुख्याने अन्य घटकांप्रमाणेच राज्य परिवहन मंडळाच्या कल्याण डेपोलाही दैनंदिन उलाढालीत आठवडाभरात सुमारे १६ लाखांची घट आली आहे.
या डेपोतून पूरग्रस्त मार्गावर सुटणाऱ्या सुमारे ४५० बसफेऱ्या रस्ते वाहतूक बंद असल्याने रद्द कराव्या लागल्या. त्यानुसार आठ दिवसांत एसटीचा ५००० किमी प्रवास कमी झाल्याने तूट भरून काढण्याचे एसटी प्रशासनासमोर आव्हान आहे. या ठिकाणाहून सुटणाऱ्या बस प्रवासाच्या माध्यमातून दिवसाला सुमारे ७.५० लाखांची तिकीट विक्रीच्या माध्यमातून उलाढाल होण्याचे उद्दिष्ट डेपो प्रशासनाने ठेवले आहे. त्यापैकी कोरोना काळात सुमारे ६ लाखापर्यंत उद्दिष्ट साध्य होत होते. आता कोविड निर्बंध शिथिल होत असताना उलाढालीत वाढ होण्याची अपेक्षा होती. त्यातच महापूर आल्याने सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. या कालावधीत सुमारे १६ लाखांची घट पुन्हा आली असून दिवसाला सुमारे २ लाखांनी व्यवसाय कमी झाला आहे. हा पूर परिस्थितीचा फटका असल्याचे सांगण्यात आले. तूट भरून काढण्यासाठी त्या डेपोतून सुटणाऱ्या सर्व मार्गांवरील रस्ते वाहतूक सुरळीत सुरू राहायला हवी, असेही सांगण्यात आले.
--------
गणेशोत्सवासाठी ग्रुप बुकिंग सुरू आहे. प्रवाशांनी चांगले सहकार्य केल्यास तूट भरून काढण्यासाठी आशावादी चित्र आहे. डेपोत येऊन या सुविधेचा लाभ घ्यावा. पूर परिस्थितीच्या संकटातून बाहेर येणे, हे एसटी प्रशासनासमोर आव्हान आहे. पण सर्व व्यवस्थित होईल अशी आशा आहे.
विजय गायकवाड, आगार व्यवस्थापक, कल्याण आगार