बेकायदा गाळ्यांवर सुनावणी
By Admin | Updated: March 26, 2017 04:21 IST2017-03-26T04:21:10+5:302017-03-26T04:21:10+5:30
कल्याण -बदलापूर रस्त्याला लागून असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या जागेवर बेकायदा उभारण्यात आलेल्या

बेकायदा गाळ्यांवर सुनावणी
अंबरनाथ : कल्याण -बदलापूर रस्त्याला लागून असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या जागेवर बेकायदा उभारण्यात आलेल्या ४५ गाळ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे. याच बेकायदा बांधकाम प्रकरणात महसूलमंत्र्यांनी स्थगिती आदेश उठवत या दुकानांवरील कारवाईचा मार्ग खुला केला होता. मात्र, आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून ही कारवाई लांबणीवर टाकली आहे.
कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाला लागून असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाला राज्य सरकारने शेती विषय शिकवण्यासाठी जागा दिली होती. मात्र, शाळेत शेती हा विषय बंद पडल्याने ही जागा पडीक होती. या जागेचा गैरवापर करत काही व्यापाऱ्यांनी या जागेवर ४५ दुकाने उभारून ही जागा हडप केली होती. या दुकानांची तक्रार शैकत शेख यांनी जिल्हाधिकारी आणि नंतर राज्य सरकारकडे केली होती. न्याय न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने यासंदर्भात मंत्रालयात महसूल मंत्र्यांकडे सुनावणी घेऊन हा प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी सुनावणी घेत या कारवाईला देण्यात आलेली स्थगिती उठवली.
बांधकामावरील स्थगिती उठवल्याने कारवाईचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार, या दुकानांवर पालिका आणि तहसीलदारांकडून कारवाई करण्यात येणार होती. मात्र, या दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)