नगरसेवकाच्या छळवणुकीमुळे त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: November 13, 2016 02:59 IST2016-11-13T02:59:21+5:302016-11-13T02:59:21+5:30
राबोडीतील रहिवासी अब्दुल काझी (५०) यांनी शनिवारी सकाळी राहत्या इमारतीच्या गच्चीवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. काझी यांनी स्वत:ला पेटवून घेण्यापूर्वीच

नगरसेवकाच्या छळवणुकीमुळे त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
ठाणे : राबोडीतील रहिवासी अब्दुल काझी (५०) यांनी शनिवारी सकाळी राहत्या इमारतीच्या गच्चीवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. काझी यांनी स्वत:ला पेटवून घेण्यापूर्वीच त्यांच्या मित्राने त्यांच्या हातातील मशाल खेचून घेतल्याने ते बचावले. हा प्रकार करण्यापूर्वी काझी यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये नगरसेवक नजीब मुल्ला यांना जबाबदार धरले. मात्र, मुल्ला यांनी हे आरोप फेटाळून लावले.
काझी यांच्या मालकीची राबोडीत १४ खोल्यांची चाळ आहे. या चाळीत ७० रुपये भाडे देऊन १४ भाडोत्री राहतात. काझी यांनी २० वर्षांपूर्वी ही चाळ विकत घेतली. चाळमालकाची पूर्वपरवानगी न घेता भाडोत्री वाढीव बांधकाम करीत असल्याने त्याविरोधात कोर्टात केस सुरू आहे. कोर्टाने मालकालाच दुरुस्ती करण्याची परवानगी दिली असल्याचे काझींचे म्हणणे आहे. परंतु, स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला हेही जागा विकसित करण्यासाठी त्यांनी पाठवलेल्या बिल्डरशी करार करण्याकरिता दबाव आणत असल्याचा आरोप काझी यांनी केला आहे. मागील १० वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत, पोलीस ठाण्यात शुक्रवारी फोनवरून कळवले होते. मात्र, तक्रारीची दखल न घेतल्याने शनिवारी या वारंवारच्या त्रासाला कंटाळून हा मार्ग स्वीकारल्याचे काझींचे म्हणणे आहे. काझी यांना राबोडी पोलिसांनी सिव्हील रुग्णालयात दाखल केले आहे.
नगरसेवक मुल्ला हे यापूर्वी सुरज परमार प्रकरणात अटकेत होते. सध्या त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. (प्रतिनिधी)
काझी हे त्या ठिकाणी अनधिकृतपणे तळ अधिक दोन मजल्यांची इमारत बांधणार होते. येथील भाडेकरूंनी पालिकेकडे रीतसर अर्ज करून धोकादायक घरांच्या दुरुस्तीची परवानगी मागितली होती. पालिकेने परवानगी दिली होती. परंतु, काझींनी ही परवानगी रद्द करण्याची मागणी करून मलाच या ठिकाणी इमारत बांधण्यासाठी परवानगी द्यावी, असा हट्ट धरला होता. माझी मागणी मान्य केली नाही, तर मी जीवाचे बरेवाईट करून घेईन आणि तुमची नावे लिहून ठेवीन, अशी धमकीही दिली होती. शनिवारी सकाळी येथील महिलांनी राबोडी पोलीस ठाण्यात काझींच्या विरोधात एनसीदेखील नोंदवली आहे. मी केवळ अनधिकृत बांधकामालाच विरोध केल्याने त्याने सुसाइड नोटमध्ये माझे नाव घेतले असावे. - नजीब मुल्ला, नगरसेवक