वो कहते है हाथ में तेरे, त्रिशूल रहे तलवार रहे!

By Admin | Updated: February 6, 2017 04:17 IST2017-02-06T04:17:22+5:302017-02-06T04:17:22+5:30

मंदिर, मशीद ही समाधानाची ठिकाणे नाहीत, हे सांगूनही सध्या समाजाला त्याच दिशेने नेले जात आहे.

He says in your hand, you are a trident, a sword! | वो कहते है हाथ में तेरे, त्रिशूल रहे तलवार रहे!

वो कहते है हाथ में तेरे, त्रिशूल रहे तलवार रहे!

पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : मंदिर, मशीद ही समाधानाची ठिकाणे नाहीत, हे सांगूनही सध्या समाजाला त्याच दिशेने नेले जात आहे. त्यांच्या धर्मवापसी, घरवापसीला आम्ही पुरस्कारवापसीने उत्तर दिले. पण, समाजापुढचे जगण्याचे प्रश्न डावलून जेव्हा विचार मांडणाऱ्यांचीच हत्या केली जाते, तेव्हा अशा समाजात साहित्यिकांनी पुढे येऊन आंदोलकांना साथ देण्याची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. त्याला पूरक म्हणून त्यांनी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांनंतरच्या कवितेतील ‘वो कहते है हाथ में तेरे, त्रिशूल रहे तलवार रहे’ या कवितेच्या ओळी सादर केल्या.
साहित्य संमेलनातील ‘प्रतिभायन’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनीही आपल्या साहित्यप्रतिभेतील विविध टप्पे या वेळी उलगडून दाखवले. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी त्यांना बोलते केले. आंदोलकांपेक्षाही कवयित्री म्हणून मेधा पाटकर उपस्थित होत्या. तिन्ही प्रतिभावंतांचा चळवळीशी संबंध असल्याने तेथे आपसूकच परिवारविरोधी सूर उमटला.
नर्मदा आंदोलन, त्यासाठीच्या घोषणा, गीते यांचा संदर्भ देत मेधा यांनी मनात साठलेली भावना एखाद्या उद््ध्वस्त क्षणी कवितेचे रूप घेऊन कशी बाहेर येते, याचे वर्र्णन केले. आंदोलनानिमित्त सतत सर्वांच्या गराड्यात असूनही जाणवणारे एकाकीपण त्यांच्या शब्दांतून व्यक्त झाले. कवितेतून आतील खदखद बाहेर येते, असे सांगतानाच कविता झाली की, निर्मितीमुळे आजही मन सुखावते, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. मला माझ्या कवितेचे कागद कधी जपून ठेवता आले नाहीत. त्याही अशाच अवतीभोवती विरून गेल्या. कवितेसारखेच आयुष्यही हरवून गेले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त करताच आणि स्त्रीच्या वेदनांना शब्दरूप देताना त्यांचे भरून आलेले डोळे, कातर झालेल्या आवाजामुळे उपस्थितही हेलावले. ‘एका उद््ध्वस्त क्षणाची वाफ होऊन मी विरून जावे म्हणतेय आरपार’ या त्यांच्या शब्दांनी वातावरण सुन्न झाले. आंदोलकांना बांधून ठेवण्याचा मार्ग म्हणून कविता जन्म घेत गेली. त्या जबाबदारीमुळे ती उतरवत गेले, अन्यथा ती व्यक्त झाली नसती, असे त्या सांगून गेल्या. माझ्या कवितांचे पुस्तक व्हावे, असे कधी वाटले नाही. कारण, पुस्तके ही मी बांधीलकीचे प्रतीक मानत नाही असे त्यांनी सांगितली.


अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...
मी योग्य वेळी प्रकाशक झालो. त्यामुळे अनेक चांगल्या लेखकांचे लिखाण प्रकाशित करता आले. अनेक नवे लेखक प्रकाशात आणता आले. माझ्यासोबत अनेक प्रकाशक या व्यवसायात आले. त्यांनीही अनेक चांगले प्रयोग केले, पण त्यांना माझ्यासारखी प्रकाशनाची संस्था घडवता आली नाही. मराठी प्रकाशक म्हणून जरी माझा गौरव होत असला, तरी माझा ८० टक्के व्यवसाय इंग्रजी प्रकाशनाचा आहे, असे रामदास भटकळ यांनी नमूद केले. स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनीही लेखन, संगीत, विविध कलांचा सहवास कसा घडला, त्याची माहिती दिली. सध्याच्या वातावरणावर मार्मिक भाष्य करत त्यांनी ‘उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ ही कविता सादर केली.


‘ज्ञानभाषा होण्यासाठी मराठीत लिखाण’
उच्चविद्याविभूषित असणे, त्यातून उत्तम पगाराच्या नोकऱ्या, पंचतारांकित जगणे जगताना भेटलेल्या मित्रपरिवारामुळे मी जमिनीवर आलो. साध्या जगण्याकडे वळलो. जे जे ज्ञान संपादित केले, ते ते मराठीत आणण्याच्या ध्यासातून लिहिता झालो, असा प्रतिभाप्रवास अच्युत गोडबोले यांनी मांडला. मराठी ही ज्ञानभाषा व्हायची असेल, तर वेगळ्या विषयांचे जे ज्ञान आपल्याला मिळाले आहे, ते मराठीत आणावे म्हणून मी लिहिता झालो, असे त्यांनी सांगितले. मी काही काळ चळवळीत काम केले. पण, त्यातही पुढे मला माझ्या मर्यादा लक्षात आल्या, अशी कबुली त्यांनी दिली. नंतर समारोपावेळी त्यांनी राग कसे ओळखावेत, याची अप्रतिम झलक सादर केली.


...तर मग आंदोलनासाठी परदेशी पैसा लागणार नाही!
विकासाच्या नावाखाली देशातील मूळ निवासी असलेला आदिवासी हुसकावून अंबानी, अदानी यांचे पर्यटन सजवले जात आहे, असा आरोप मेधा यांनी केला आणि रोहिल वेमुलाच्या बलिदानाचा उल्लेख करून भोवती एवढी हिंसा घडत असूनही स्वत:ला अहिंसक म्हणायची लाज वाटते, अशी टीकाही केली. स्मार्ट सिटी घडवणाऱ्यांनी आम्हाला विकासविरोधी, राष्ट्रविरोधी ठरवले. आम्ही आज मायनॉरिटी आहोत, पण, एकदा मेजॉरिटी-मायनॉरिटीचा संघर्ष होऊन जाऊ द्या, अशी निर्णायक भाषाही पाटकर यांनी केली. साहित्य संमेलनासाठी धावून येणाऱ्या समाजाने कधीतरी पिळवणूक होणाऱ्यांसाठीही धावून यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पाच बुद्धिजीवी जरी पाठीशी उभे राहिले, तरी समाजात काय होते, ते आम्ही दाखवून दिले आहे. तसे झाले तर परदेशी पैसा न घेताही आम्हाला आंदोलने करता येतील, असा टोलाही त्यांनी अभिजनवर्गाला लगावला.

Web Title: He says in your hand, you are a trident, a sword!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.