घोषणांच्या बाजारात फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 11:27 PM2021-05-07T23:27:28+5:302021-05-07T23:28:37+5:30

सरकारविरोधात संताप : पॅकेजचा विसर पडल्याची टीका

The hawkers did not even fall into the hands of the announcement market | घोषणांच्या बाजारात फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही

घोषणांच्या बाजारात फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही

Next

मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रथम संचारबंदी आणि त्यानंतर लॉकडाऊन लागू केला. या लॉकडाऊनमध्ये रोजी बंद असली तरी रोटीची व्यवस्था केली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साडेपाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यात रिक्षाचालक, फेरीवाले यांच्या खात्यात दीड हजार रुपये १५ ते ३० एप्रिलपर्यंत जमा केले जातील, अशी घोषणा केली. मात्र, आता पुन्हा १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला तरी अद्याप फेरीवाल्यांच्या खात्यात एक दमडीही जमा झालेली नाही.

सरकारची रोटी देण्याची घोषणा केवळ कागदावर असून ती हवेत विरली आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या पॅकेजची रक्कम गेली कुठे असा सवाल फेरीवाले करीत आहेत. सरकारने ही रोटीची रक्कम देण्यासाठी नोंदणीकृत फेरीवाल्यांचा निकष लावला होता. नोंदणी नसलेले फेरीवाले हे माणूस नाहीत का असाही सवाल नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांनी केला. मात्र, आता नोंदणी असलेल्या फेरीवाल्यांच्या पदरातही काही पडलेले नाही. दिवसाला १०० रुपये याप्रमाणे पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनचा अंदाज घेता दीड हजार रुपये जमा करण्यात येतील असे सांगितले होते. पहिल्या पंधरा दिवसांची रक्कमच खात्यात जमा झालेली नसताना लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीसाठी कोणतीही मदत नाही. पहिलीच मदत प्राप्त झालेली नसताना दुसऱ्या मदतीची अपेक्षा कशी काय करणार असा प्रश्न फेरीवाल्यांनी केला आहे. 
फेरीवाल्यांसाठी लढा देणाऱ्या डाव्या संघटनांनी महाविकास आघाडीची ही घोषणा निव्वळ अफवा होती अशी टीका केली आहे. संचारबंदीयुक्त लॉकडाऊनमुळे १४ एप्रिल ते १५ मे पर्यंतचा फेरीवाल्यांचा धंदा बुडाला आहे. महिनाभर बसून असल्याने कुटुंबाच्या पोटाला खायला  काय घालायचे असा प्रश्न फेरीवाल्यांना सतावित आहे. रोजी पण नाही आणि रोटी पण नाही अशी स्थिती फेरीवाल्यांवर आली आहे.

फेरीवाले काय म्हणतात

आमचा रोजगार बुडाला आहे. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा पूर्ण रोजगार ठप्प होता. लाट ओसरल्यावर कुठे धंदा सुरू झाला होता. आता पुन्हा बंद आहे. पोटाला काय खायचे असा प्रश्न आहे. सरकारने घोषित केलेली मदत खात्यात जमाच झालेली नाही.     
    -विलास उतेकर

मी नोंदणीकृत फेरीवाला आहे.  राज्य सरकारने लॉकडाऊन करताना जाहीर केलेली रक्कम कशी आणि कुठून मिळणार, याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. त्यामुळे मी मदतीपासून वंचित आहे. माझ्याबरोबर इतरांनाही मदत मिळालेली नाही.     
    - रामदास बोडके

अनेकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र, त्यापैकी एकाच्याही खात्यात दीड हजार रुपये जमा झालेले नाहीत. घोषणा करणाऱ्या सरकारने केवळ घोषणा करून आशा लावण्यापेक्षा खरोखरच ही मदत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली की नाही याची पाहणी करावी.    - संतोष गुप्ता

सरकारने घोषणा केली आहे. मात्र, त्यासंदर्भातील पत्रक अथवा आदेश आमच्या विभागाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अद्याप आमच्याकडे एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. सरकारी आदेश प्राप्त झाल्याशिवाय नक्की काय व कशा प्रकारे करायचे हे अद्याप स्पष्ट नाही.
    - प्रशांत गवाणकर, फेरीवाला विभाग अधिकारी, केडीएमसी.

 

Web Title: The hawkers did not even fall into the hands of the announcement market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे