चार वॉर्डांचा एक प्रभाग केल्याने राजकीय गणिते बिघडणार
By Admin | Updated: May 12, 2016 02:11 IST2016-05-12T02:11:13+5:302016-05-12T02:11:13+5:30
मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे नवोदित, इच्छुक आणि प्रस्थापित उमेदवारांत

चार वॉर्डांचा एक प्रभाग केल्याने राजकीय गणिते बिघडणार
ठाणे : मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे नवोदित, इच्छुक आणि प्रस्थापित उमेदवारांत कमालीची अवस्थता पसरली आहे. सध्याच्या प्रभागांवर वर्चस्व ठेवलेल्या प्रस्थापितांबरोबरच नवोदित कार्यकर्तेही चौपट खर्च आणि बदलणाऱ्या राजकीय गणितांच्या कल्पनेनेच हैराण झाले आहेत.
आधी एकदा करून पाहिलेला आणि अंमलबजावणीच्या पातळीवर फसलेला प्रयोग पुन्हा कशासाठी, हा प्रश्न जसा राजकीय वर्तुळात चर्चिला जात होता, त्याचबरोबर नव्या प्रभागांची रचना कशी असेल, याबाबत बुधवारी दिवसभर चर्चा सुरू होती. नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीला एक न्याय आणि आता ठाणे, उल्हासनगरला वेगळा न्याय कशासाठी, अशी भूमिका घेत विरोधक राज्य सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
ठाणे महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये अपेक्षित आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी दोन प्रभागांचा एक प्रभाग केला होता. त्यात प्रत्येकी एका महिला आणि एका पुरुष उमेदवाराची निवड झाली. यातही एका तगड्या उमेदवाराबरोबर एक तुलनेने कमकुवत उमेदवारही निवडून आला. काही ठिकाणी अनेक प्रस्थापितांना धक्का बसला. आता आगामी निवडणुकीनिमित्ताने प्रभाग रचनेच्या हालचाली सुरू आहेत.
ठाणे शहरातील अनेक भागांवर त्या त्या परिसरातील प्रस्थापितांचे वर्चस्व आहे. काही भागांतून वर्षानुवर्षे एकाच उमेदवाराचा विजय होतो आहे. त्यांनी त्या भागात नागरी सुविधा पुरवण्याबरोबरच सातत्याने मतदारांना वैयक्तिक मदतही केली आहे. त्यातूनच तेथे त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. गेल्या निवडणुकीत अशा नगरसेवकांची निवडून येताना काही अंशी कसोटी लागली. मात्र, पुढील निवडणुकीत चार प्रभागांचा एक प्रभाग होणार असल्याने प्रस्थापितही हादरले आहेत.
ठाण्याच्या अनेक भागांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. काही प्रभागांत तर शिवसेनेच्या उमेदवाराला किमान दोन ते तीन हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. परंतु, काही वॉर्डांत एका ठिकाणी शिवसेना, तर दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादी अथवा कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आल्याने त्याचा फटका प्रभागाच्या विकासाला बसल्याचे दिसून आले. ठरावीक भागाने आपल्याला मत दिले नाही म्हणून त्या भागात कामच न करण्याचा पवित्राही काही नगरसेवकांनी घेतला होता. अशीच स्थिती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्याही काही उमेदवारांची आहे. येत्या निवडणुकीसाठी आणखी दोन प्रभागांमधील मतदारांची जबाबदारी खांद्यावर आल्याने मागील निवडणुकीत ज्या प्रबळ उमेदवारांनी एकाच वेळी दोन-दोन वॉर्ड हाताळले होते, त्या प्रस्थापितांची पंचाईत होणार आहे.
त्यांच्याप्रमाणेच नवोदित कार्यकर्तेही हादरले आहेत. निवडणुकीवर डोळा ठेवत त्यांनी विशिष्ट भागात मोर्चेबांधणी केली. मात्र, आता परिसर चौपट झाल्याने त्यांची तयारी-राजकीय गणिते कोलमडून पडणार असून प्रत्येकाला आता चौपट खर्चाची तयारी करावी लागणार आहे. या निर्णयाचे जोरदार पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.
- संबंधित बातमी पान ३