२० वर्षात गेले १७५ बळी
By Admin | Updated: August 5, 2015 00:35 IST2015-08-05T00:35:28+5:302015-08-05T00:35:28+5:30
ठाणे महापालिकेने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शहरातील ५८ अतिधोकादायक इमारतींपैकी ३६ इमारतींवर पाडकाम कारवाई सुरुवात केली असली तरी मागील

२० वर्षात गेले १७५ बळी
अजित मांडके, ठाणे
ठाणे महापालिकेने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शहरातील ५८ अतिधोकादायक इमारतींपैकी ३६ इमारतींवर पाडकाम कारवाई सुरुवात केली असली तरी मागील २० वर्षात शहरात विविध ठिकाणी १४ इमारत दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये आतापर्यंत १७५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर १३७ जण जखमी झाले असून यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. परंतु या इमारती का उभ्या राहतात, त्याला जबाबदार कोण हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. विशेष म्हणजे शहरात दरवर्षी अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची संख्या ही वाढतच असून भय इथले संपत नाही, नव्हे तर ‘भय इथले कधीच संपणार नाही’ असे म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर ओढवली आहे. अजून किती बळी घेणार असा संतप्त सवाल त्यांच्याकडून होऊ लागला आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत अथवा धोकादायक इमारतींचा प्रश्न हा आजचा नाही, मागील २० वर्षे या शहराला अशा इमारतींचा प्रश्न भेडसावत आहे. १४ डिसेंबर १९९५ रोजी ठाण्यात पहिली इमारत दुर्घटना घडली. ती सुद्धा मुंब्य्रातील रशिद कंपाऊंड परिसरात. या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले होते. त्यानंतर वागळे इस्टेट भागात ०७ नोव्हेंबर १९९८ मध्ये साईराज इमारत दुर्घटना घडली. यामध्ये १६ जणांचा बळी जाऊन १४ जण जखमी झाले होते. दरम्यान अशा इमारत दुर्घटना घडत असतांनाच ४ एप्रिल २०१३ रोजी, मुंब्य्रात लकी कंपाऊंडमध्ये केवळ सात महिन्यात उभारण्यात आलेली सात मजली इमारत कोसळून तब्बल ७४ जणांचा बळी गेला आणि ५६ जण जखमी झाले होते. त्यानंतर पालिका प्रशासन, वनविभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य म्हणजे राजकीय मंडळी खडबडून जागे झाले आणि त्यांनी ठाण्यासाठी क्लस्टर लागू करा अशी मागणी रेटून धरली. यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनेही झाली. मागील वर्षी ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्यासाठी क्लस्टर लागू केले. परंतु अंमलबजावणी मात्र झाली नाही.
ही चर्चा आता केवळ पावसाळ्यापुरती मर्यादीत राहिली असून, पावसाळा संपला की पुढील पावसाळ्यापर्यंत यावर सर्व पक्षीय नेत्यांचे मौन असते. परंतु, यामुळे ठाण्यात इमारत कोसळण्याच्या दुर्घटना वाढतच असून याला जबाबदार कोण आणि किती बळी घेणार असा सवाल मात्र या निमित्ताने ठाणेकर उपस्थित करु लागले आहेत.