झेपमुळे मिळाले हरयाणाच्या रुग्णाला प्लाझ्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST2021-05-06T04:42:58+5:302021-05-06T04:42:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे शहरातील झेप प्रतिष्ठानमुळे हरयानातील दोन रुग्णांना प्लाझ्मा मिळाला. याआधी संस्थने दिल्लीतील रुग्णालाही प्लाझ्मादाते ...

झेपमुळे मिळाले हरयाणाच्या रुग्णाला प्लाझ्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरातील झेप प्रतिष्ठानमुळे हरयानातील दोन रुग्णांना प्लाझ्मा मिळाला. याआधी संस्थने दिल्लीतील रुग्णालाही प्लाझ्मादाते मिळवून दिले होते.
झेप प्रतिष्ठानने गेल्या काही दिवसांत कोविडच्या कठीण काळात लोकांना प्लाझ्मादान करण्यासाठी सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून लोकांना आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान करून जवळपास ११४ रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. झेप प्रतिष्ठानची ही घोडदौड ठाणे मुंबईतच नाही तर पुणे, नगर ते थेट हरियाणापर्यंत पोहोचली. तेथील कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्माची मदत करण्यात आली. फरिदाबाद येथील मोहित शर्मा आणि गुरगाव येथील सचिन अरोरा या रुग्णांसाठी सोशल मीडियावर प्लाझ्मासाठी आवाहन झाल्यावर प्रतिष्ठानने हरियाणामध्ये त्यांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. सोशल मीडियाचा अचूक वापर करून दोन पेशंटचे प्राण वाचवण्यासाठी केल्यामुळे झेप प्रतिष्ठानचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर गेल्या १५ दिवसांत तब्बल ७४ जणांना प्लाझ्मा, २४ बेड, १७ इंजेक्शन तसेच दोन रक्तदाते दिले आहेत. कोरोनातून बरे झालेले रुग्ण काही बाबींच्या पूर्तता केल्यावर किमान दोन लोकांचे प्राण वाचवू शकतात. त्यामुळे या जीवघेण्या संकटातून बरे झालेल्या लोकांनी पुढे येऊन प्लाझ्मादान करून लोकांचे प्राण वाचवावे, असे आवाहन झेप प्रतिष्ठानने केले आहे.
अवघ्या तीन तासांत झेप प्रतिष्ठाने हरयाणा येथील त्या कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्माची मदत मिळवून दिली. एकाला २ मे तर दुसऱ्याला ४ मे रोजी प्लाझ्मा मिळवून देण्यात आला.
--------------------
- हरियाणातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती सोशल मीडियावरून झेप प्रतिष्ठानकडे आली. त्यांची खातरजमा करून प्लाझ्मासाठी माहिती मिळवण्याची तयारी सुरू केली. त्यातूनच हरियाणा येथील काही व्यक्तींना संपर्क करून तिथून त्यांनी या पेशंटसाठी प्लाझ्मा मिळवून दिला.
- विकास धनवडे, संस्थापक - अध्यक्ष, झेप प्रतिष्ठान
----------------