खारफुटीमध्ये उभारलेल्या झोपड्यांवर हातोडा
By Admin | Updated: December 24, 2016 03:01 IST2016-12-24T03:01:04+5:302016-12-24T03:01:04+5:30
भार्इंदरच्या राई, शिवनेरीनगर येथील खारफुटीची मोठमोठी झाडे कापून तसेच भराव करून बांधलेल्या झोपड्यांवर महसूल

खारफुटीमध्ये उभारलेल्या झोपड्यांवर हातोडा
मीरा रोड : भार्इंदरच्या राई, शिवनेरीनगर येथील खारफुटीची मोठमोठी झाडे कापून तसेच भराव करून बांधलेल्या झोपड्यांवर महसूल विभागाने महापालिकेच्या सहकार्याने तोड कारवाई केली.
शिवनेरीनगर शासकीय जमिनीवर असून सीआरझेड-१ मध्ये आहे. नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या भागाची पाहणी करून कारवाईचे आदेश दिले होते. महापालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादाने येथील खारफुटीची मोठमोठी झाडे सर्रास कापून, त्यात भराव करून कच्ची तसेच पक्की बांधकामे झाली आहेत. तसेच या भागात येथे करआकारणी, पाणीजोडणी, शौचालय, रस्ते, भराव, अन्य झाडांची लागवड होत आहे. रिलायन्स एनर्जीकडून वीजपुरवठा केला जातो. या परिसरात भूमाफिया सक्रिय असून सरकारी जागेतील कच्च्या झोपड्या वा पककया खोल्या विकून ते मोकळे होत आहेत. येथील बांधकामांप्रकरणी तक्रारी होत असताना महापालिका मात्र सरकारी जमीन असल्याचे सांगत स्वत:ची जबाबदारी झटकून टाकते. महसूल विभागाकडूनही मनुष्यबळाअभावी कारवाईस विलंब होतो.
त्या अनुषंगाने येथील गल्ली क्र. १ ते ३ परिसराच्या शेवटी नव्याने झालेल्या कच्च्या पत्र्याच्या झोपड्या मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार, प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात तोडून टाकल्या. या ठिकाणी जेसीबी येण्याचा मार्ग नसल्याने हातानेच तोड कारवाई करावी लागली. (प्रतिनिधी)