कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर माफ केल्याचा प्रकार, उल्हासनगर महापालिकेसमोर अर्धनग्न उपोषण
By सदानंद नाईक | Updated: May 27, 2025 20:22 IST2025-05-27T20:21:12+5:302025-05-27T20:22:34+5:30
सदानंद नाईक, उल्हासनगर महापालिका निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी बाकी असताना एका मोठ्या कंपनीचा ९ कोटींचा मालमत्ता कर माफ केल्याच्या ...

कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर माफ केल्याचा प्रकार, उल्हासनगर महापालिकेसमोर अर्धनग्न उपोषण
सदानंद नाईक, उल्हासनगर
महापालिका निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी बाकी असताना एका मोठ्या कंपनीचा ९ कोटींचा मालमत्ता कर माफ केल्याच्या निषेधार्थ समाजसेवक नरेश गायकवाड हे महापालिकेसमोर गेल्या ७ दिवसापासून उपोषण करीत आहेत. याबाबत आयुक्तांनी चौकशी करून मालमत्ता कर माफ करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगर महापालिकेने एका मोठ्या कंपनीचा मालमत्ता कर माफ केल्याचा प्रकार गेल्या काही महिन्यापूर्वी गाजला होता. भाजपच्या नेत्याने यावर आक्षेप घेऊन याप्रकरणी चौकशीची मागणी करून कारवाईची मागणी केली होती.
तत्कालीन आयुक्तांनी दिले होते कारवाईचे संकेत
तत्कालीन आयुक्तानी याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करून अहवाला नंतर कारवाईचे संकेत दिले होते. तेव्हापासून हे प्रकरण धुळखात पडले आहे. दरम्यान समाजसेवक व शरद पवार गटाचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांनी ९ कोटीची मालमत्ता कर माफी प्रकरणी कारवाईची मागणी करून त्या निधीतून महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्याची मागणी केली.
गायकवाड यांनी महापालिका मुख्यालया समोर गेल्या ७ दिवसांपूर्वी उपोषण सुरु केले.
महापालिका आयुक्त व अधिकारी हे गायकवाड यांच्या मागणीला दाद देत नसल्याने, त्यांनी सोमवारपासून अर्धनग्न आंदोलन सुरु केले. त्यांच्या उपोषणाला महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे.
गायकवाड यांच्या महापालिकेला इशारा
महापालिका अशीच दुर्लक्ष करीत राहिल्यास अंगावरील एकएक कपडा काढून आंदोलन करण्याचे संकेत दिले. मालमत्ता कर विभागाच्या एका कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत त्यांनी आवाज उठवीला असून त्यांची शैक्षणिक माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली.
९ कोटी मालमत्ता कर माफी नंतर एका बँकेच्या जागेचे मालमत्ता कर माफी बाबतचेही प्रकरण गाजले होते. आयुक्तानी याबाबत दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती मागितली होती. एकूणच मालमत्ता कर विभाग वादात सापडल्याचे बोलले जात आहे.