Gym trainer by day, robber by night | दिवसा जिम ट्रेनर, रात्री दरोडेखोर

दिवसा जिम ट्रेनर, रात्री दरोडेखोर

भिवंडी : भिवंडी शहरात दिवसा जिममध्ये व्यायामाचे धडे देऊन रात्रीच्या अंधारात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या तीन आरोपींसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे यामध्ये एका अल्पवयीन आरोपीसह एका महिलेचाही समावेश आहे.
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ फेब्रुवारी रोजी एका खानावळमध्ये घुसून आरोपींनी खानावळ चालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवला. त्याला चाकूने जखमी करीत तीन मोबाईल चोरी केल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शांतीनगर येथील दोन व निजामपुरा येथील एक अशा तीन गुन्ह्यांची उकल केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील तीन आरोपी हे जिम ट्रेनर आहेत. ते दिवसा युवकांना व्यायामाचे प्रशिक्षण देऊन रात्री घरफोड्या करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय इतर पाच घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले असून त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा, चाकू, ९ हजार रुपयांचे दोन मोबाईल, २ हजार रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली.

Web Title: Gym trainer by day, robber by night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.