उल्हासनगरात १५ लाख ८० हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST2021-06-18T04:27:59+5:302021-06-18T04:27:59+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं.-४ येथील संत रामदास हॉस्पिटलशेजारील गोदामातून विविध वाहनांतून वितरण होणाऱ्या गुटख्याच्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन ...

उल्हासनगरात १५ लाख ८० हजारांचा गुटखा जप्त
उल्हासनगर : कॅम्प नं.-४ येथील संत रामदास हॉस्पिटलशेजारील गोदामातून विविध वाहनांतून वितरण होणाऱ्या गुटख्याच्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून १५ लाख ८० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात १३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
उल्हासनगरात विमल गुटका, शुद्ध प्लस पान मसाला, सुगंधी मसाला आदी गुटखांची सर्रास विक्री होत असल्याची चर्चा आहे. मात्र, स्थानिक प्रशासन व पोलीस यांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संत रामदास हॉस्पिटल परिसरातील एका गोदामातून शहरासह इतरत्र गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती संबंधित विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. विभागाचे सहायक आयुक्त व अन्न व सुरक्षा अधिकारी अपर्णा विरकायदे यांच्या पथकाने बुधवारी सकाळी साडेसहा वाजता छापा टाकून गोदामासमोर उभी असलेली सहापेक्षा जास्त वाहने ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली. त्यामध्ये विविध कंपन्यांच्या गुटख्याची पाकिटे सापडली. वाहनांमध्ये १५ लाख ८० हजार रुपये किमतीचा गुटखा होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी दिलीप वलेच्छा, नीलेश डिंगरा या मुख्य आरोपींसह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दिलीप याला पूर्वीही गुटखा विक्रीप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतरही त्याने गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला होता. गोदामापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.