गोळ्या घालून विचार संपविता येत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:26 AM2019-08-27T00:26:43+5:302019-08-27T00:26:48+5:30

गोपाळ नेवे यांचे मत : राष्ट्र सेवा दलातर्फे डोंबिवलीत एकलव्यांचा सन्मान

guns cannot end thoughts | गोळ्या घालून विचार संपविता येत नाहीत

गोळ्या घालून विचार संपविता येत नाहीत

Next

कल्याण : ‘विचारवंतांचे विचार गोळ्या घालून संपविता येत नाहीत. कोणत्याही समस्येवरील ते उत्तर नाही. या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात समाजाने आवाज उठविण्याची गरज आहे. हा आवाज जोपर्यंत जोरात येणार नाही, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित नाही आहात’, असे मत राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष गोपाळ नेवे यांनी व्यक्त केले.


राष्ट्र सेवा दलातर्फे एकलव्य सन्मान पुरस्कार सोहळा रविवारी सार्वजनिक वाचनालयात झाला. यावेळी नेवे बोलत होते. प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेवक कासिफ तानकी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पंडित, प्रशांत देशपांडे, नॅशनल उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य फरझाना पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.


नेवे म्हणाले, ‘तुम्ही सर्वजण सुरक्षित राहावेत, यासाठी दल कायम प्रयत्नशील राहील. समाजाने आपला आवाज वाढविला तर धर्मजातीच्या नावावर कोणाचा जीव जाणार नाही. सध्या समाजात माणसुकी कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ती वाढविण्याची गरज आहे. ५० वर्षांपूर्वी त्याची गरज नव्हती. सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागांची पाहणी करताना एक गोष्ट जाणवली की, माणूस संकटात असताना माणुसकी कमी पडली. ही सर्व परिस्थिती प्रत्यक्षात पाहिली, त्यावेळी वेदना झाल्या. त्या वेदना तुम्हाला जाणवल्या पाहिजेत, ही अपेक्षा आहे. तरच, समाजात बदल घडेल. कोणत्याही एकलव्याने श्रद्धा किंवा अंधश्रद्धेनेही आपला अंगठ्याचे दान देऊ नये. आपल्या शिक्षणव्यवस्थेत गुरूची मक्तेदारी प्रस्थापितांकडे आहे. आपण जन्म कुठे घ्यावा, आपल्या हातात नसेल, तरी कर्तृत्व आपल्या हातात आहे, तेव्हा ते निर्माण करा.’


देशपांडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी कोणत्याही कार्यक्रमाला जाताना वेळेचे पालन केले पाहिजे. आता तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश करणार आहात. तेथे वक्तशीर असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात हा एक विचार जरी आत्मसात केला तरी सेवा दल कार्य सफल होईल.’


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष नरेश चव्हाण, अविनाश रत्नपारखी, मनोज नागरे, रजिया बागवान, विशाल जाधव, मधुरत्ना पगारे यांनी मेहनत घेतली.

शिक्षणामुळेच समाजात बदल घडेल
पठाण म्हणाल्या, ‘आपल्या येथे प्रत्येक घरात एक एकलव्य आहे. आपल्याला त्यांना जपायचे आहे. या एकलव्यांनी मेहनत घेतली म्हणूनच आज त्यांना या पुरस्काराच्या रूपाने फळ मिळत आहे. तुमच्या आकांक्षेला मर्यादा असता कामा नयेत. आमच्या संस्थेत येणाºया कोणत्याही विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश नाकारत नाही. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाते. मुलांना शिक्षणाचे धडे दिले पाहिजेत, तरच आपण समाज बदलू शकतो. काही विद्यार्थ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र नाही. परंतु, त्यांना प्रवेश नाकारला जात नाही. स्वत:मध्ये क्षमता निर्माण करा, म्हणजे आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही.’

Web Title: guns cannot end thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.