३ वर्षीय मुलीच्या पायातील जांगेत अडकली गाईड वायर; कळवा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

By अजित मांडके | Published: October 27, 2023 05:59 PM2023-10-27T17:59:21+5:302023-10-27T17:59:33+5:30

ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे.

Guide wire stuck in leg of 3-year-old girl; Shocking Incident In Kalwa hospital | ३ वर्षीय मुलीच्या पायातील जांगेत अडकली गाईड वायर; कळवा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

३ वर्षीय मुलीच्या पायातील जांगेत अडकली गाईड वायर; कळवा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

ठाणे : कळवा रुग्णालयात १६ रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यु झाल्याचे प्रकरण ताजे असतांनाच, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या एका तीन वर्षीय मुलीच्या पायातील जांगेत गाईड वायर (सुई) अडकल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यात जांगेतील अकडलेली सुई काढण्यासाठी तीच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात कार्डीअ‍ॅक सर्जनच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तीला मुंबईतील जेजे रुग्णालयात हलविण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.

ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे. आॅगस्ट महिन्यात एकाच दिवशी १६ रुग्णांचा मृत्यु झाल्यानंतर ते अधिकच चर्चेत आले आहे. त्यानंतर या प्रकरणाचा अहवाल सादर होऊन कारवाई होणे अपेक्षित असतांना अद्यापही अहवाल शासनाकडून सादर झालेला नाही. असे असतांना आता तीन वर्षीय मुलीच्या बाबत गंभीर घटना घडली आहे. ही मुलगी साधारणपणे एक महिन्यापूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी तिला निमोनिया झाला होता, तीची प्रकृती अंत्यत खालावली असल्याने तिला व्हॅन्टींलेटवर ठेवण्यात आले होते. यावेळी तिला सलाईन लावण्यासाठी हाताची नस सापडत नसल्याने, तिला सेंटरल लाईन टाकावी लागणार होती. त्यासाठी डॉक्टरांनी तिच्या पायाची नस धरुन त्याद्वारे तिच्यावर उपचार सुरु केले. मात्र त्याचवेळेस पायाच्या जांगेत तिच्या गाईड वायर (सुई) अडकली. ती अद्यापही काढता आलेली नाही. तिची प्रकृती नाजूक असल्याने तिच्या पायातील गाईड वायर काढता येणे शक्य नव्हते अशी माहिती रुग्णालयाचे डॉ. अनिरुध्द माळगावकर यांनी दिली.

गाईड वायर सरळ असते. परंतु माणसाच्या अंगातील नसा सरळ असत नाहीत, त्यामुळेच कदाचित हा प्रकार घडला असावा असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच ते  इंजेक्शन नसून गाईड वायर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हि गाईड वायर रुग्णांच्या शरीरात एक ते दीड महिना राहिल्यास काहीची धोका पोहोचत नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच गाईड वायर काढण्यापेक्षा त्या मुलीचा जीव वाचवणे महत्वाचे होते. त्यानुसार त्या मुलीवर योग्य उपचार करण्यात आले असून आज ती मुलगी व्हेंटीलेटवर आणि ऑक्सिजन शिवाय देखील श्वासोच्छ्वास घेत असून तीची प्रकृति ठणठणीत असल्याची माहिती माळगावकर यांनी दिली.

तसेच त्या मुलीची शरीरात अडकलेली गाईड वायर काढण्यासाठी इंटरव्हेशनल  कार्डिएक सर्जन व इतर तज्ञ  नसल्याचे देखील त्यांनी मान्य केले असून ती वायर काढण्यासाठी जेजे रुग्णालयात पाठवावे लागणार असल्याची कल्पना देखील त्या मुलीच्या पालकांना दिली असल्याची त्यांनी सांगितले. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी व्टीट केले असून रुग्णालयाच्या कारभारावर टिका केली आहे. मुलीवर उपचार करताना पायातील जांगेत सुई तुटली असून १६ दिवसानंतर देखील ती काढण्यात आली नसल्याबाबतचे ट्वीट केले होते. तसेच ते इंजेक्शन काढण्यासाठी करावी लागणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी तज्ञ डॉक्टरच उपलब्ध नसल्याचे देखील त्यांनी त्यात म्हंटले आहे.

Web Title: Guide wire stuck in leg of 3-year-old girl; Shocking Incident In Kalwa hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.