बारावे प्रकल्पाला हिरवा कंदील
By Admin | Updated: December 22, 2016 05:39 IST2016-12-22T05:39:56+5:302016-12-22T05:39:56+5:30
येथील बारावे गोदरेज हिल परिसरात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी भरावभूमी प्रकल्प उभारण्यास

बारावे प्रकल्पाला हिरवा कंदील
कल्याण : येथील बारावे गोदरेज हिल परिसरात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी भरावभूमी प्रकल्प उभारण्यास मंगळवारच्या महासभेत स्थानिक नगरसेविका रजनी मिरकुटे वगळता अन्य सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी मान्यता दिली. यासंदर्भात प्रशासनाने सादर केलेला प्रस्ताव बहुचर्चेनंतर मंजूर करण्यात आला.
शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारले जाणार आहेत. काही ठिकाणी कामांना प्रारंभही झाला आहे. तसेच आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी नुकतीच निविदा मंजूर करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्याचाच एक भाग म्हणून बारावे गोदरेज हिल परिसरात शास्त्रोक्त पद्धतीने भरावभूमी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मंगळवारी प्रशासनाने सादर केला होता.
बारावे येथे हा प्रकल्प मे. गोदरेज कन्झ्युमर्स प्रॉडक्ट लिमिटेड ही कंपनी १० वर्षे कालावधीसाठी चालवणार आहे. या प्रकल्पातून किमान दैनंदिन १८ मेट्रिक टन घनकचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. यात महापालिकेची तीन कोटी २८ लाखांची बचत होणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु, हा प्रस्ताव चर्चेला येताच मिरकुटे यांनी विरोध दर्शवला. गोदरेज हिल परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. तसेच प्रकल्पासाठी जागाही पुरेशी नाही. याठिकाणी बीएसयूपी प्रकल्प तसेच शाळाही असल्याने या प्रकल्पामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे, याकडे मिरकुटे यांनी लक्ष वेधले.
महापालिका प्रशासन एखाद्या प्रभागात प्रकल्प राबवताना स्थानिक नगरसेवकाला विश्वासात घेत नाही, असा आरोप यावेळी दीपेश म्हात्रे यांनी केला. प्रशासनाने वस्तुस्थिती लक्षात आणून देणे आवश्यक होते. त्यातूनच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजुती दूर होण्यास मदत होईल, असे म्हात्रे म्हणाले.
महापालिका हद्दीत १३ बायोगॅस प्रकल्प राबवले जाणार आहेत. ते सर्व एकत्रितपणे सुरू करा, अशी मागणी करताना या प्रकल्पांची सद्य:स्थिती काय, असा सवाल नगरसेवक जयवंत भोईर यांनी उपस्थित केला. यावर, उंबर्डे, आयरे आणि राजूनगर याठिकाणी प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी घेऊन पुढील कार्यवाहीला प्रारंभ केल्याची माहिती प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)