गोविंदवाडी बायपास आठवडाभरात खुला
By Admin | Updated: December 27, 2016 02:52 IST2016-12-27T02:52:37+5:302016-12-27T02:52:37+5:30
शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी तयार केलेल्या कल्याण पत्रीपूल ते दुर्गाडी या एक किलोमीटरच्या गोविंदवाडी बायपास रस्त्याची एक बाजू आठवडाभरात
गोविंदवाडी बायपास आठवडाभरात खुला
कल्याण : शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी तयार केलेल्या कल्याण पत्रीपूल ते दुर्गाडी या एक किलोमीटरच्या गोविंदवाडी बायपास रस्त्याची एक बाजू आठवडाभरात तर दुसरी बाजू महिनाभरात खुली केली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली.
कल्याणमध्ये उभारण्यात येत असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, गोविंदवाडी बायपास रस्त्याची शिंदे यांनी सोमवारी पाहणी केली. त्याचबरोबर डोंबिवलीतील घरडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाजवळ केडीएमसीच्या १८ घंटागाड्यांचेही लोकार्पण केले. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, मल्लेश शेट्टी, माजी नगरसेवक सचिन बासरे आदी मान्यवर उपस्थित होते.
एमएसआरडीसीने २०११ पासून एमएमआरडीएच्या निधीतून गोविंदवाडी बायपास तयार केला. त्याचे दुर्गाडीकडील एक टोक तबेल्याच्या पुनर्वसनामुळे रखडले होते. हा वाद न्यायप्रविष्ट होता. तबेलेवाल्याचे पुनर्वसन पालिकेने केल्याने रस्त्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शरफुद्दीन कर्ते व स्थानिक नगरसेवक काशीब तानकी यांनी सहकार्य केले. तेव्हा रस्ता सुरु करण्यात कोणतीही अडसर येणार नाही, अशी ग्वाही २०१५ च्या महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे यांनी दिली होती.
सोमवारी या रस्त्याची पाहणी करून एक बाजू आठवडाभरात, तर दुसरी महिनाभरात खुली करण्याची घोषणा केली. त्यामुळे कल्याणमधील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
बाळासाहेबांचे स्मारक १० जानेवारीपर्यंत पूर्ण
कल्याण पश्चिमेला काळा तलाव येथे १० कोटी खर्चून उभारण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम १० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. ठाकरे यांचा पुतळा कोल्हापुरात तयार करण्यात आला आहे.
स्मारकाच्या ठिकाणी भव्य कमान, तसेच आर्ट गॅलरी उभारली आहे. तेथे बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडण्यात येईल. या स्मारकाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे महापालिकेच्या हद्दीतही स्मारक उभारण्यात येणार आहे.
मात्र या दोन्ही महापालिकांच्या आधी नव्हे, तर देशातील पहिले स्मारक पूर्ण करण्याचा मान कल्याण-डोंबिवली महापालिकेला मिळणार आहे. बाळासाहेबांचे बालपण काळा तलाव परिसरात गेले असल्याने महापालिकेने काळा तलावाचे सुशोभिकरण केले. या तलावाच्या विकासाचे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्नही शिवसेनेने पूर्ण केले.