भिवंडीत चार नवीन पोलीस ठाण्यांचे शासनाचे प्रस्ताव
By Admin | Updated: September 14, 2015 23:14 IST2015-09-14T23:14:17+5:302015-09-14T23:14:17+5:30
भिवंडी पोलीस उपायुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील शहर आणि ग्रामीण भागात झपाट्याने होणारा विकास आणि वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भिवंडीत वंजारपाटीनाका, मानसरोवर, कारिवली
भिवंडीत चार नवीन पोलीस ठाण्यांचे शासनाचे प्रस्ताव
- पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
भिवंडी पोलीस उपायुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील शहर आणि ग्रामीण भागात झपाट्याने होणारा विकास आणि वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भिवंडीत वंजारपाटीनाका, मानसरोवर, कारिवली व दापोडे या चार नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव शासनाकडे संबंधित विभागामार्फत पाठविले असून ते शासनाच्या विचाराधीन आहेत.
पोलीस उपायुक्तालयांतर्गत सध्या शहर व ग्रामीणमध्ये शहर पोलीस ठाणे, निजामपूर पोलीस ठाणे, भोईवाडा पोलीस ठाणे, नारपोली पोलीस ठाणे, शांतीनगर पोलीस ठाणे व कोनगाव पोलीस ठाणे अशी सहा पोलीस ठाणी आहेत. या सर्व पोलीस ठाण्यांना ग्रामीण भागही जोडला असल्याने त्यांची पुनर्रचना करणे, ही काळाची गरज बनली आहे.म्हणून शांतीनगर व निजामपूर पोलीस ठाण्यांची हद्द कमी करून वंजारपाटीनाका पोलीस ठाणे बनविण्याचे प्रस्तावित आहे.शहर व नारपोली पोलीस ठाण्यांची हद्द कमी करून मानसरोवर पोलीस ठाणे प्रस्तावित आहे.भोईवाडा व नारपोली पोलीस ठाण्यांची हद्द कमी करून कारिवली पोलीस ठाणे प्रस्तावित आहे. तर, नारपोली पोलीस ठाण्याच्या सध्याच्या हद्दीची विभागणी करून दापोडे पोलीस ठाणे प्रस्तावित आहे.
भिवंडीचे पहिले पोलीस ठाणे असलेल्या तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राचे विलीनीकरण नवीन चार पोलीस ठाण्यांत करण्याबाबत प्रस्तावात नमूद केले आहे. भिवंडीचे झपाट्याने नागरीकरण होत असताना पोलीसकामांतदेखील सुसूत्रता यावी, यासाठी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.या प्रस्तावानुसार गुन्हेगारीवर अंकुश व गुन्हे प्रकटीकरणास गती मिळणार आहे.ही सर्व नियोजित पोलीस ठाणी मिळून एकूण १० पोलीस ठाणे परिमंडळ २ मध्ये होणार आहे.
या सर्व पोलीस ठाण्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता सध्याचा अधिकारीवर्ग कमी असून नव्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त,नवीन दोन सहायक पोलीस आयुक्त व एक पोलीस उपायुक्त आणि मनुष्यबळाची मागणी प्रस्तावात केलेली आहे.शहर व ग्रामीणची भौगोलिक परिस्थिती तसेच झपाट्याने होणारे नागरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे अस्तित्वात असलेली पोलीस यंत्रणा भविष्यात कमी पडणार आहे.याचा सारासार विचार करून शहरातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पोलीस विभाग आणि संबंधित विभागाने मिळून शासनाकडे हा प्रस्ताव पाठविला आहे. त्याचप्रमाणे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना राहण्याची निवासस्थानेदेखील शासनाने बांधून देण्याविषयी प्रस्तावात नमूद केले आहे.
भिवंडी परिमंडळ २ मधील सध्याचे पोलीस उपायुक्त,दोन सहा.पोलीस आयुक्त व पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना शासकीय निवासस्थाने नसल्याने ते खाजगी ब्लॉकमध्ये भाड्याने राहत आहेत.तर, पोलीस नियंत्रणशेजारील पोलीस संकुलातील रूममध्ये १२ पोलीस अधिकारी राहत आहेत.
पोलीस नियंत्रण कक्षाच्या पहिल्या मजल्यावर पोलीस उपायुक्तांचे कार्यालय असून ही इमारत जुनी झाल्याने ठिकठिकाणी गळते.तसेच अंतर्गत कामकाजासाठी जागा अपुरी पडते.नियंत्रण कक्षातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सध्या असलेल्या ड्रेस चेंजिंग रूमची दुरवस्था झाली आहे.
सध्या असलेल्या इमारतीच्या बांधकामास तीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. त्यामुळे इमारतीचे नव्याने बांधकाम करून नूतनीकरण करण्याची मागणी केली असून त्यासाठी आमदार महेश चौघुले यांनी इमारतीच्या नूतनीकरणास ५०लाख रुपये व निजामपूर पोलीस ठाण्याच्या नवीन नियोजित इमारतीसाठी २५ लाख रुपये जाहीर केले आहेत. नियोजित इमारती व प्रस्तावित पोलीस ठाणे झाल्यानंतर भिवंडीच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांच्या कामास गती मिळणार आहे.