गुडमॉर्निंग पथकाचा भिवंडीत फार्स
By Admin | Updated: March 14, 2017 01:40 IST2017-03-14T01:40:12+5:302017-03-14T01:40:12+5:30
दोन-तीन दिवसांपासून भिवंडीतील विविध ठिकाणी सकाळी गुडमॉर्निंग पथक फिरून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांना दोन किलोमीटरवर सोडण्याची कारवाई करते आहे.

गुडमॉर्निंग पथकाचा भिवंडीत फार्स
भिवंडी : दोन-तीन दिवसांपासून भिवंडीतील विविध ठिकाणी सकाळी गुडमॉर्निंग पथक फिरून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांना दोन किलोमीटरवर सोडण्याची कारवाई करते आहे.
मंौजे फेणेपाडा येथे तीन हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. तेथील सार्वजनिक शौचालय तुडूंब घाणीने भरलेले आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने भाजपाचे माजी शहराध्यक्ष श्याम अग्रवाल यांनी मनपाच्या स्वच्छता विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची देखरेख केली जात नाही किंवा निगा राखली जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. परिणामी नागरिकांना जवळच्या जंगलात उघड्यावर जावे लागत आहे. तेथे मनपाचे गुडमॉर्निंग पथक जाते. नागरिकांना पकडून दोन किलोमीटर लांब सोडते. पण मूळ प्रश्न सोडविणे आपल्याच हाती असूनही तो सोडवत नसल्याचा संतप्त नागरिकांचा आरोप आहे.
या प्रकरणात आता पालिका आयुक्तांनीच लक्ष घालून शौचालयांच्या स्वच्छतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच शौचालय पूर्ववत सुरू करावे. अन्यथा नागरिकांचे गुडमॉर्निंग पथक अधिकाऱ्यांना दोन किलोमीटरवर सोडून येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कोंबडपाडा भागात १३ कुटुंबे विना शौचालयाची असून त्यापैकी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय अनुदानातून पालिकेने वैयक्तिक वापरासाठी दोन कुटुंबांना शौचालये बांधून दिली होती. ती शौचालये गावगुंडांनी तोडून टाकली. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्याने फौजदारी गुन्हा न नोंदविता केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवित नागरिकांची बोळवण केली. त्यामुळे आता उपायुक्त अनिल डोंगरे व स्वच्छता अधिकारी सुभाष झळके यांनी पुढाकार घेऊन येथील सर्व कुटुंबांसाठी पुन्हा शौचालये बांधून देण्यासाठी पुढाकार घ्यावा,अशी मागणी समाजवादी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केली आहे. (प्रतिनिधी)