रस्ता द्या, अन्यथा मुंब्रा वेगळे करा!
By Admin | Updated: September 2, 2016 03:46 IST2016-09-02T03:46:54+5:302016-09-02T03:46:54+5:30
मुंब्य्रासाठी पर्यायी रस्ता देणार नसाल, तर मी माझ्या नगरसेवकपदाचा राजीनामा देतो, असा इशारा देऊन शिवसेनेचेच नगरसेवक सुधीर भगत यांनी महासभेत सत्ताधाऱ्यांना घरचा
रस्ता द्या, अन्यथा मुंब्रा वेगळे करा!
ठाणे : मुंब्य्रासाठी पर्यायी रस्ता देणार नसाल, तर मी माझ्या नगरसेवकपदाचा राजीनामा देतो, असा इशारा देऊन शिवसेनेचेच नगरसेवक सुधीर भगत यांनी महासभेत सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. सुविधा देता येत नसतील, तर ठाणे महापालिकेतून मुंब्रा वेगळे करा, अशा मागणी त्यांनी केली. त्यांना अन्य नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने आणि मुंब्य्रात पक्षाला पाय रोवायचे असल्याने महापौरांनीही अखेर त्यांची मागणी मान्य केली.
शहरात सर्वत्र रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. परंतु, नेहमी मुंब्य्राला डावलले जाते. त्यामुळे सत्तेच असल्याची लाज वाटते, असेही उद्विग्न उद्गार त्यांनी काढले. सत्ताधारी नगरसेवकानेच अशा प्रकारे घरचा आहेर दिल्याने अखेर महापौर संजय मोरे यांनी मुंब्य्रासाठी पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव तयार करून तो लवकरात लवकर महासभेच्या पटलावर ठेवावा, असे आदेश प्रशासनाला दिले.
बुधवारी खंडित झालेली महासभा पुन्हा गुरुवारी सुरू झाली. परंतु, मुंब्य्रातील शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत हे दुपारी २ वाजता महासभेला हजर झाले. मुंब्रा रेल्वे स्टेशन ते आत्माराम चौकापर्यंत असलेल्या वाहतूककोंडीचा फटका बसल्याने ते सभागृहात येताच संतप्त होऊन अजेंड्यावरील विषय सुरू असतानाच त्यांनी आपल्या या भावना व्यक्त केल्या. शहराच्या विविध भागांत रस्ता रुंदीकरण सुरू आहे. परंतु, मुंब्य्रालाच का डावलले जाते, असा सवाल त्यांनी महापौरांना केला.
या वाहतूककोंडीचा फटका माझ्या मुलाला बसला असून त्याला आज शाळेत घेण्यात आले नाही. त्यामुळे मुंब्य्राला वेगळा रस्ता द्या, नाहीतर मी माझ्या नगरसेवकपदाचा राजीनामा देतो. आमची कामे होणार नसतील तर सत्तेत असल्याची लाज वाटते, असे म्हणावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. पर्यायी रस्ता देणार नसाल तर मुंब्रा पालिकेतून वगळा, तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्याच पक्षातील नगरसेवक बालाजी काकडे यांनी आणि मनसेतून नुकतेच शिवसेनेत आलेले शैलेश पाटील यांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे शिवसेनेच्या इतर नगरसेवकांची मात्र चांगलीच गोची झाली. त्यात विरोधकांनीदेखील यावर तोंडसुख घेतल्याने सत्ताधारी शिवसेना चांगलीच अडचणीत आल्याचे दिसून आले. या पर्यायी रस्त्याचा निर्णय आताच घ्या, असा नारा या नगरसेवकांनी लावून धरल्याने अखेर महापौर संजय मोरे यांनी या ठिकाणी पर्यायी रस्ता होऊ शकतो का, याची तपासणी करून तशा स्वरूपाचा प्रस्ताव तत्काळ पटलावर आणावा, असे आदेश दिले. त्यानंतर, संतप्त झालेले नगरसेवक शांत झाले.
दिव्याला दुसरा न्याय
सध्या दिव्यातील मनसेच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्या प्रभागात आता कोट्यवधींची कामे केली जात आहेत. परंतु, मुंब्य्रातील कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दिव्यातील नगरसेवकांचे शिवसेनेत इनकमिंग झाल्याने त्यांच्यासाठी कोट्यवधींची कामे होत आहेत, मग आता मुंब्य्राच्या विकासासाठी देखील आम्ही इनकमिंग करायचे का, असा सवाल करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच चिमटा काढला.