‘परिवहन’वर संधी देताना कसब पणाला!
By Admin | Updated: February 7, 2017 03:57 IST2017-02-07T03:57:57+5:302017-02-07T03:57:57+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीमधील सहा जागांसाठी १५ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपामधील इच्छुकांची

‘परिवहन’वर संधी देताना कसब पणाला!
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीमधील सहा जागांसाठी १५ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपामधील इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने कोणाला संधी द्यायची, यावरून दोन्ही पक्षांचे कसब पणाला लागले आहे. या कसरतीत त्यांना पक्षांतर्गत नाराजीचादेखील सामना करावा लागत आहे. आतापर्यंत अर्ज नेलेल्या इच्छुकांपैकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
परिवहन समितीसाठी मंगळवार, ७ फेब्रुवारीला अर्ज स्वीकारले जाणार आहे. सध्याचे संख्याबळ पाहता मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा सदस्य समितीवर निवडून येणे अशक्य आहे. त्यामुळे सदस्य निवडून आणण्यासाठी विरोधकांची कसोटी लागणार आहे. एका नगरसेवकाला सहा मते देण्याचा अधिकार आहे. महापालिकेतील उपलब्ध संख्याबळानुसार शिवसेनेचे तीन सदस्य सहज समितीवर निवडून जाऊ शकतात. तर, भाजपाचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात.
मात्र, सेना-भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने सदस्यांना संधी देताना डावलल्यांची नाराजीदेखील ओढून घ्यावी लागत आहे. परिवहन समितीवर डावलल्यामुळे भाजपामध्ये नाराजीचा सूर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रशांत माळी यांच्या रूपाने उमटला असला तरी शिवसेनेतही सारे काही आलबेल आहे, अशी परिस्थिती नाही. दरम्यान, ५४ इच्छुकांनी अर्ज नेले असून मंगळवारी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यात कोण उमेदवारी अर्ज दाखल करतो, याबाबत उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)