पैसा, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:41 IST2021-07-27T04:41:43+5:302021-07-27T04:41:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आता काळ बदलला, पण तरीही हुंड्यासाठी विवाहित महिलांचा विविध मार्गांनी शारीरिक आणि मानसिक छळ, ...

पैसा, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या !
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आता काळ बदलला, पण तरीही हुंड्यासाठी विवाहित महिलांचा विविध मार्गांनी शारीरिक आणि मानसिक छळ, तसेच अत्याचाराचे प्रकार हे सुरूच आहेत. हुंड्यासाठी छळाचे प्रकार अधिक असले, तरी हुंडाबळीचे प्रकार तसे कमी आहेत. गेल्या दीड वर्षामध्ये हुंड्यासाठी छळामुळे ३६ महिलांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांमध्ये २०१८ मध्ये २५, २०१९ मध्ये १७, २०२० मध्ये १० तर २०२१ मध्ये १३ महिलांनी आत्महत्या केली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलम ३०६ अंतर्गत पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हे दाखल झाले, तर ३०४-ब अर्थात, हुंड्यासाठी छळामुळे सदोष मनुष्यवधाचा २०१८ ते २०२० या तीन वर्षांत २४ घटना घडल्या, तर जून, २०२१ पर्यंत दोन घटनांची नोंद झाली.
आता अलीकडेही, लग्नात आम्हाला हुंडा नको, पण मुलीच्या अंगावर दागिने तेवढे असू द्या. मुलाला वाहन व्यवसायासाठी भांडवल तेवढे द्या, अशी मागणी करून हुंडा मागितला जातो. यातूनच पुढे छळाचे प्रकार होतात. या अनिष्ट प्रथांना नवीन पिढीनेच अटकाव करणे गरजेचे असल्याचे मत, पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
* अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत...
हुंड्याची मागणी करणारे काही अशिक्षितच आहेत असे नाही, तर अगदी इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षकांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंतही आहेत. अशाच एका गुन्ह्यात तर एका डॉक्टरने उच्चशिक्षित पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला होता. ठाण्यात अगदी अलीकडे दोन लाख रुपये घेतल्यानंतरही ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या पत्नीचा क्षुल्लक कारणावरून खून केल्याची घटना अगदी आठवड्यापूर्वीच कळव्यात समोर आली.
*हुंड्यासाठी छळाचे गुन्हे
२०१८-३१०
२०१९-४२७
२०२०-२५९
२०२१ (जूनपर्यंत) -२४९