मुंबई - अंबरनाथ तालुक्यातील कौजे-करवले येथील आवश्यक शासकीय जमीन महापालिकेच्या भराव भूमी प्रकल्पासाठी दिली जाईल. मात्र, गावाच्या विकासासाठी, पुनर्वसनासाठी व सोयी सुविधांसाठी जागा शिल्लक राहिल, असे नियोजन करावे. यासाठी ग्रामपंचायत व महानगरपालिकेने एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. कौजे-करवले येथील शासकीय जमीन भराव भूमी प्रकल्पावरून वाद सुरू असून त्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री बावनकुळे यांनी बैठक घेतली. आ. सुलभा गायकवाड यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
२० एकर देण्याची मागणी२०१८ पासून गावाजवळील ५२ एकर शासकीय जमीन ताब्यात घेऊनही तिचा योग्य वापर झाला नाही याबद्दल नाराजी व्यक्त करत ग्रामस्थांनी २० एकर जागा सार्वजनिक सुविधांसाठी देण्याची मागणी केली.
आदिवासी पाड्यातील घरांचा प्रश्न२०११ पूर्वीची आदिवासी पाड्यातील १०० घरे नियमित करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून १०० लोकांची सुधारित यादी तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. प्रशासनाने प्रस्तावित ५ हेक्टर जागेत शाळा, मैदान व इतर सोयी-सुविधांचा समावेश केला जाईल असे स्पष्ट केले. तर, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ५.५ हेक्टर पर्यायी जागा देण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी मंत्री बावनकुळे यांनी प्रकल्प व स्थानिक गावकरी दोन्ही सुरक्षित राहतील या दृष्टीने काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.