वाढवणचे भूत विरोधकांच्याच मानगुटीवर!

By Admin | Updated: February 17, 2016 01:46 IST2016-02-17T01:46:30+5:302016-02-17T01:46:30+5:30

वाढवण बंदराच्या उभारणीला भाजपा सरकारने परवानगी दिल्याने सत्तेत सहभागी असलेली शिवसेना किनारपट्टीवरील उध्वस्त होणाऱ्या मतदारांच्या जीवनाशी खेळत असल्याच्या विरोधकांच्या

Ghosts of the opponents of the rise! | वाढवणचे भूत विरोधकांच्याच मानगुटीवर!

वाढवणचे भूत विरोधकांच्याच मानगुटीवर!

पालघर : वाढवण बंदराच्या उभारणीला भाजपा सरकारने परवानगी दिल्याने सत्तेत सहभागी असलेली शिवसेना किनारपट्टीवरील उध्वस्त होणाऱ्या मतदारांच्या जीवनाशी खेळत असल्याच्या विरोधकांच्या प्रचाराचे भूत शिवसैनिकांनी विरोधकांच्या च मानगुटीवर बसवून त्यांना पराभवाची चव चाखायला लावली.
वाढवण बंदराला भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर सेनेचे राज्यातील पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ही वाढवण बंदर होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत केल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआने वाढवण बंदराला निवडणुकीतील प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनविला होता. या वाढवण बंदरामुळे पालघर डहाणू भागातील किनारपट्टीवर राहणारे मच्छीमार, शेतकरी, डायमेकर्स, बागायतदार, उध्वस्त होणार असल्याचा प्रचार विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात केला जात होता. ज्या बाळासाहेबांनी सन १९९८ साली वाढवण बंदर रद्द करायला लावले. मृत्यूपश्चात त्यांच्या पवित्र अस्थिही वाढवणच्या पवित्र शंखोद्वाराजवळ विसर्जित करण्यात आल्या होत्या. अशावेळी हे पवित्र ठिकाणच युती सरकार उद्ध्वस्त करीत असल्याचा प्रचार यावेळी केला गेल्याने सेनेच्या गटात चिंतेचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पालघरमध्ये प्रचारासाठी आणण्यात आले होते. त्यांनीही पालघरच्या प्रचारसभेत हो आम्हाला विकास हवाय! मात्र या विकासामध्ये सर्वसामान्यांना आम्हाला भागीदार करून घ्यायचे आहे असे वाढवण बंदराला समर्थनीय ठरेल असे वक्तव्य करून सेनेच्या चिंतेमध्ये आणखीच भर टाकली. अशा वेळी सेनेची पुरती भिस्त उरली होती ती उद्धव ठाकरे यांच्यावरच. त्यांनी चिंचणीच्या गावदेवी मैदानावर घेतलेल्या प्रचंड जनसमुदायासमोर स्व. बाळासाहेबांनी वाढवण बंदर रद्द करण्याच्या घोषणेच्या स्मृतीना उजाळा दिला. मतांसाठी आम्ही तुम्हा मतदारांपुढे वाडगे घेऊन येतो. मग हा वाढवण, जिंदाल प्रकल्प हवा कि नको हे तुम्हाला विचारायलाच हवे , असे त्यांनी सांगून तुम्ही हो म्हणालात तरच वाढवण बंदर होईल. अन्यथा होणार नाही असे सांगून वाढवण बंदर होऊ नये अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याची घोषणा केल्यानंतर वाढवण, टिघरेपाडा, धाकटी डहाणू इ. भागातील किनारपट्टीवरील मतदारांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवून सेनेला भरघोस मतदान केले. यावेळी वाढवण बंदराबाबत अपप्रचार करून सेनेला अडचणीत आणण्याचा विरोधकांचा डाव शिवसैनिकांनी हाणून पाडीत विरोधकांच्या मानगुटीवरच वाढवण बंदराचे भूत बसवून त्यांना पराभवाची चव चाखायला लावल्याची प्रतिक्रीया या पोटनिवडणुकीतील विजयाचे खरे शिल्पकार ठरणारे ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पालघर विधानसभा मतदारसंघ हा सेनेचा बालेकिल्ला होता व यापुढेही राहील, अशी प्रतिक्रियाही शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली. (वार्ताहर)अमीत घोडा यांचा विजय हा एक ऐतिहासिक विजय असून शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा, उद्धवजींच्या नेतृत्वाचा आणि महायुतीचा हा विजय असल्याचे सांगून विरोधकांच्या वाढवण बंदर विरोधी भूलथापांना शिवसैनिकांनी थारा दिलेला नाही. त्यामुळे शिवसेना आजही जनतेबरोबर आहे आणि उद्याही राहणार आहे. मेक इन इंडिया प्रमाणे पालघरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या ठिकाणी मोठे उद्योग आले पाहिजेत. सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मेक इन इंडिया प्रमाणे मेक इन पालघर अशी घोषणा ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे या राज्याचा मंत्रीम्हणून अमीत घोडा यांना बरोबर घेऊन जनतेचा विकास साधण्याचा प्रयत्न करीन.
- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री
पालघर मधील मतदारांनी जो कौल दिलाय तो विनम्रपणे मी स्वीकारला आहे. ३५ वर्षात जी विकासाची कामे झाली नव्हती ती मी पाच वर्षात करण्याचा प्रयत्न केला. तरी दुर्दैवाने माझ्या विरोधात जरी कौल गेला असला तरी २०१४ पेक्षा माझ्या मतामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मतदारांनी जो विश्वास दाखविला आहे. त्याला तडा जाऊ देणार नाही.
सेना, भाजपाने आपल्या सत्तेचा दुरूपयोग करून कासा इ. ग्रामीण भागात साम, दाम, दंडाचा वापर करून विशेषता पैशाचा वापर केला. युतीचे खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वावर करून दबाव निर्माण केल्यामुळेच मतदारांनी सेनेला मतदान केले. परंतु पराभवामुळे न डगमगता भविष्य काळामध्ये ग्रामीण भागातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत राहील.
- राजेंद्र गावित, काँग्रेसचे उमेदवार

Web Title: Ghosts of the opponents of the rise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.