घोडबंदरच्या कावेसार तलावाचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST2021-03-21T04:39:48+5:302021-03-21T04:39:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घोडबंदर भागातील कावेसार तलावाचा आता कायापालट होणार आहे. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी एकूण चार कोटी ...

घोडबंदरच्या कावेसार तलावाचा होणार कायापालट
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर भागातील कावेसार तलावाचा आता कायापालट होणार आहे. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी एकूण चार कोटी २६ लाख ७१ हजार ३०१ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी राज्य शासनाने त्यांच्या हिश्श्यापोटी असलेली दोन कोटी ९८ लाख ६९ हजार ९११ रुपयांची रक्कम ठाणे महापालिकेला दिली आहे.
ठाणे महापालिकेने मागील काही वर्षांत शहरातील तलावांची निगा, देखभाल आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार, कावेसार येथील तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी चार कोटी २६ लाख ७१ हजार ३०१ रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून त्याची अर्धी रक्कम मिळावी, यासाठी महापालिकेने पाठपुरावा केला होता. त्यानुसार, २७ ऑक्टोबर २०१५ ला राज्य शासनाने २५ लाखांचा निधी दिला होता. परंतु, आता शिल्लक असलेला दोन कोटी ९८ लाख ६९ हजार ९११ रुपयांचा निधीही देण्यात येत असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार, आता हा निधी आल्यानंतर पालिका आता या तलावाचे सुशोभीकरण करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
असे होणार सुशोभीकरण
कावेसार तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण करणे. मासेमारी, तलावाच्या आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण, विद्युतव्यवस्था चालण्यासाठी मार्गिका आदींसह इतर सुशोभीकरणाची कामे, यामध्ये केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
----------------