ठाण्यातील घोडबंदर रोड अखेर होणार वाहतूककोंडीमुक्त, राजन विचारे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 12:35 AM2020-12-09T00:35:38+5:302020-12-09T00:37:03+5:30

Ghodbunder Road News :

Ghodbunder Road in Thane will finally be traffic free, says Rajan Vichare | ठाण्यातील घोडबंदर रोड अखेर होणार वाहतूककोंडीमुक्त, राजन विचारे यांची माहिती

ठाण्यातील घोडबंदर रोड अखेर होणार वाहतूककोंडीमुक्त, राजन विचारे यांची माहिती

Next

ठाणे : ठामपाची हद्द संपते व मीरा भाईंदर मनपाची हद्द सुरू होते, त्या ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गायमुख घाट ते फाउंटन हॉटेलपर्यंत नव्याने होणाऱ्या उन्नत मार्गाची पाहणी मंगळवारी खासदार राजन विचारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत केली.

घोडबंदर मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी टिकुजीनी वाडी ते बोरीवली या भुयारी मार्गाला गती देण्यासाठी २०१६ साली संसदेत विचारे यांनी मुद्दा उपस्थित केला होता. या कामाला वनखात्याची परवानगी न मिळाल्याने विलंब लागत होता. या प्रकल्पाच्या तसेच घोडबंदर रोडच्या वाहतूककोंडीवर काय उपाययोजना संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे, असाही सवाल त्यांनी त्या वेळी केला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत तातडीने गायमुख ते फाउंटन हॉटेल असा ४ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्गाचा प्रस्ताव बनविण्यात आला. २४ नोव्हेंबर २०१७ रोजी ६६७ कोटींच्या सदर प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली.

दरम्यान, मंगळवारी विचारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी व बैठक आयोजित करून या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना केल्या. या प्रकल्पासाठी लागणारी वन खात्याची जागा अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी महिन्याभरात मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. नवीन वर्षात या कामाची सुरुवात करू, असे विचारे यांनी सांगितले. 

या पाहणी दौऱ्याला आ. गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, नगरसेवक राजू भोईर, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल सावंत,  लक्ष्मण जंगम, पप्पू भिसे, जयराम मेसे, ठाणे मनपाचे नगरसेवक नरेश मनेरा, सिद्धार्थ ओवळेकर व अधिकारी आदी उपस्थित होते. 

असा असेल प्रकल्प...
अस्तित्वात असलेल्या २ २ रस्त्याचे रुंदीकरण करून रस्त्यात साडेसहा मीटर उंचीचे पिलर उभे करून त्यावर नवीन एलिव्हेटेड २ २ मार्ग बनविण्यात येणार आहे. त्यामुळे वर-खाली ४-४ अशा एकूण ८ लेनच्या मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. टोलनाक्यामुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी ३ ३ अस्तित्वात असलेल्या मार्गिका ६ ६ करण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रकल्प बीओटी तत्त्वावर असणार आहे. या रस्त्याची लांबी ४ कि.मी. असणार आहे.
 

Web Title: Ghodbunder Road in Thane will finally be traffic free, says Rajan Vichare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.