घोडबंदर, नाशिक मार्ग होणार वाहतूककोंडीमुक्त, ‘एमएमआरडीए’कडून उन्नत मार्गाच्या कामाला सुरुवात
By अजित मांडके | Updated: February 18, 2025 05:01 IST2025-02-18T04:58:51+5:302025-02-18T05:01:17+5:30
नितीन कंपनी आदी भागात माती परीक्षण सुरू आहे. एकूण ८.२४ किमीच्या उन्नत मार्गासाठी २,१८८ कोटी ६२ लाखांचा खर्च केला जाणार आहे.

घोडबंदर, नाशिक मार्ग होणार वाहतूककोंडीमुक्त, ‘एमएमआरडीए’कडून उन्नत मार्गाच्या कामाला सुरुवात
अजित मांडके
ठाणे : ‘एमएमआरडीए’ उभारत असलेल्या ‘फ्री वे’ने ठाण्यापर्यंत आल्यानंतर आनंदनगर येथून उन्नत मार्गावरून थेट खारेगाव टोलनाका गाठला तर ठाण्यातील घोडबंदर व नाशिक मार्गावर होणारी वाहतूककोंडी सुटणार आहे. ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून उन्नत मार्ग उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, तीन हात नाका, नितीन कंपनी आदी भागात माती परीक्षण सुरू आहे. एकूण ८.२४ किमीच्या उन्नत मार्गासाठी २,१८८ कोटी ६२ लाखांचा खर्च केला जाणार आहे.
मार्ग उभारताना बाधित होणाऱ्या वृक्षांचा सर्व्हे सुरू
आनंदनगर ते खारेगाव असा हा मार्ग जात असताना या मार्गात काही वृक्ष आड येत आहेत. त्यामुळे हा मार्ग उभारताना ते वृक्ष बाधित होणार आहेत; परंतु किती वृक्ष बाधित होणार याची माहिती सध्या उपलब्ध नसून वृक्षांचा सर्व्हे सुरू असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’ने दिली.
रस्त्यांचे रिंगण महत्त्वाचे
ठाण्यात येत्या काळात कोस्टल रोड, ‘फ्री वे’चा विस्तार, तसेच बोरिवली टनेल आदी कामे केली जाणार आहेत. घोडबंदर मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाले आहे.
या कामांमुळे वाहतूककोंडी सोडविण्यास मदत होणार आहे. भिवंडी, नाशिक, घोडबंदर, गुजरात, पालघर आदी ठिकाणी जाण्यासाठी हे रस्त्यांचे रिंगण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
आनंदनगर ते खारेगाव टोलनाका या मार्गावर ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून उन्नत मार्ग उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. माती परीक्षणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
पर्यावरण मान्यता
या प्रकल्पाच्या ८२४० मीटर लांबीमध्ये फक्त १२० मीटर लांबीचा कळवा पूलव्यतिरिक्त इतर संपूर्ण लांबीकरिता पर्यावरण मान्यता आवश्यकता नाही. या १२० मी. लांबीच्या पुलाच्या मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.
काम पूर्ण होण्यास चार वर्षे
आनंदनगर ते खारेगाव टोलनाका असा हा ८.२४ किमीची मार्ग असणार आहे. यात ३-३ मार्गिका असणार आहेत. ज्यांना भिवंडी किंवा नाशिकला जायचे असेल किंवा या मार्गावरून भविष्यात होणाऱ्या कोस्टल मार्गावर जायचे झाल्यास हा मार्ग उत्तम पर्याय ठरणार आहे. कामाचा कालावधी ४८ महिने असणार आहे. तसेच दोष दायित्वाचा कालावधी २४ महिन्यांचा राहणार आहे.