महानगर गॅसची लाईन बिघडल्याने मुलुंड आणि ठाण्याचा गॅस पुरवठा 9 तास खंडीत
By अजित मांडके | Updated: September 7, 2023 10:58 IST2023-09-07T10:58:25+5:302023-09-07T10:58:39+5:30
गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पूर्व येथे महानगर गॅसची मुख्य वाहिनी असलेल्या पाईपलाईनमध्ये बिघाड होवून गॅस गळती होत असल्याची माहिती महानगर गॅसच्या निदर्शनास आली.

महानगर गॅसची लाईन बिघडल्याने मुलुंड आणि ठाण्याचा गॅस पुरवठा 9 तास खंडीत
ठाणे : महानगर गॅसच्या मुख्य स्टॉप असलेल्या मुलूंड पूर्व येथील पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुलुंड पूर्व-पश्चिम आणि ठाण्याच्या कोपरी पूर्व भागाचा गॅसपुरवठा दुरुस्तीच्या कारणासाठी तब्बल ९ तास खंडीत करण्यात आल्याने दहीहंडी सणालाच हजारो ग्राहकांच्या आनंदावर विरजण आले.
गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पूर्व येथे महानगर गॅसची मुख्य वाहिनी असलेल्या पाईपलाईनमध्ये बिघाड होवून गॅस गळती होत असल्याची माहिती महानगर गॅसच्या निदर्शनास आली. महानगर गॅसने तत्काळ गॅसवाहिनी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. मात्र या कामाला पूर्ण करण्यास अवधी लागणार असल्याने सायंकाळ ४ वाजेपर्यंत येथील महानगर गॅसच्या हजारो ग्राहकांचा पुरवठा खंडीत करण्यात आला.
ऐन सणासुदीच्या काळात गॅसपुरवठा खंडीत झाल्याने गोडाधोडाचे पदार्थ बनविण्याची तयारी केलेल्या गृहिणींच्या आनंदावर विरजण आले. सदर पुरवठा खंडीत केल्याने मुलूंड पूर्व, पश्चिम व ठाण्यात कोपरी पूर्व भागाला मोठा फटका बसला. दरम्यान, सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा गॅसपुरवठा पुर्ववत करण्यात येईल, ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल महानगर गॅसने खेद व्यक्त केला आहे.