सेंद्रिय खत प्रकल्पामुळे कचरा समस्या सुटली
By Admin | Updated: November 12, 2016 06:28 IST2016-11-12T06:28:29+5:302016-11-12T06:28:29+5:30
महापालिकेच्या भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाल्यापासून सेंद्रिय खत प्रकल्प नगरसेविका मीना सोंडे यांनी स्वखर्चाने उभा केला. या प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले

सेंद्रिय खत प्रकल्पामुळे कचरा समस्या सुटली
सदानंद नाईक, उल्हासनगर
महापालिकेच्या भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाल्यापासून सेंद्रिय खत प्रकल्प नगरसेविका मीना सोंडे यांनी स्वखर्चाने उभा केला. या प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले असून राज्यपातळीवर प्रकल्पाची दखल घेतली जात आहे. मात्र, महापालिकेने साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. उल्हासनगरात अनियमितपणे कचरा उचलला जात नाही. त्यामुळे शहरात अनेकदा कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरते. त्यामुळे रोगराईची भीती होती. ही परिस्थिती विचारात घेऊन सोंडे यांनी वर्षभरापूर्वी सेंद्रिय खत प्रकल्प सुरू केला.
कॅम्प नं.-५, दूधनाका येथील जागेत स्वर्चाने सिमेंटच्या आठ मोठ्या टाक्या बनवून शेजारी पाण्याची व्यवस्था केली. कॅम्प नं-४ व ५ येथील भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाला जमा करून सिमेंटच्या टाक्यात टाकून सेंद्रिय खत बनवले. तसेच सेंद्रिय खतावर बाग फुलवली आहे. पालिकेने लावलेल्या रस्त्यालगतच्या झाडांना सेंद्रिय खत देण्याचे कामही त्या करीत आहेत.
या प्रकल्पाची दखल शासनस्तरावर घेण्यात आली. मात्र, पालिकेने त्याची साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट आदी प्रशिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून नगरसेवक केरळ आदी ठिकाणी जातात. मात्र, एका नगरसेविकेने उभ्या केलेल्या सेंद्रिय प्रकल्पाला भेट देण्याची तसदी घेत नाहीत. घराघरांतील टाकाऊ भाजीपाला कचऱ्यात टाकण्याऐवजी प्रत्येक १५ घरांमागे एक प्लास्टिकचा ड्रम त्यांनी प्रभागात ठेवला आहे. नागरिकांना टाकाऊ भाजीपाला त्यात टाकण्यास सांगितले आहे. त्यात झाडे लावली आहेत.