कचराकोंडी फुटण्याची चिन्हे
By Admin | Updated: November 16, 2016 04:27 IST2016-11-16T04:27:39+5:302016-11-16T04:27:39+5:30
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी यापूर्वी वारंवार निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळत

कचराकोंडी फुटण्याची चिन्हे
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी यापूर्वी वारंवार निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने कचऱ्याची प्रक्रिया हा विषय वारंवार चर्चेत होता. यावेळी मात्र महापालिकेने मागविलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून चारही प्रकल्पांना निविदादारांचा प्रतिसाद मिळाला आहे. या निविदांचे प्रशासनाकडून परीक्षण सुरु असून त्यानंतरच निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे सादर केल्या जाणार आहेत. ते पाहता कल्याण-डोंबिवलीतील कचराकोंडी फुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
महापालिकेने आधारवाडी डम्पिंंग ग्राऊं ड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी आत्तापर्यंत दहा वेळी निविदा मागविली होती. तिलाही गेल्या आठवड्यात प्रतिसाद मिळाला. गुजरातमधील सौराष्ट्र इन्व्हायरो कंपनीने त्याची ३० कोटींची निविदा भरली आहे. यापूर्वी नवी मुंबईतील गिरीश इंटरप्रायझेस कंपनीने निविदा सादर केली होती. ही निविदा एकमेव होती आणि जादा दराची असल्याने ती नाकारण्यात आली होती. डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी महापालिकेला भरावभूमी क्षेत्रही विकसित करायचे आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या निविदेला मिळालेल्या प्रतिसादापाठोपाठ बारावे भरावभूमीसाठी १० कोटी ९० लाखांची आणि मांडा भरावभूमीसाठी ११ कोटी ९० लाखांची निविदा सौराष्ट्र इन्व्हायरो कंपनीने भरली आहे. उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पासाठी दोन निविदा मिळाल्या आहेत. त्यापैकी सौराष्ट्र इन्व्हायरो कंपनीने १६ कोटी ४१ लाखांची निविदा भरली आहे. ठाण्यातील बायोक्लिन या कंपनीने याच प्रकल्पासाठी २४ कोटींची निविदा सादर केली आहे. ही निविदा इन्व्हायरो कंपनीने भरलेल्या किंमतीपेक्षा आठ कोटींहून अधिक रकमेची आहे. त्यामुळे उंबर्डे प्रकल्पाच्या निविदेत स्पर्धा होणार आहे. अर्थात कमी किंमतीची निविदा स्वीकारली जाण्याची दाट शक्यता आहे. या सर्व निविदा प्रशासनाने लेखा परीक्षणासाठी पाठविल्या आहेत. त्यानंतर त्या मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवल्या जाणार आहेत.
उंबर्डे येथील १० हेक्टर जागेवर ३०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभा करणे अपेक्षित आहे. त्यात कचऱ्याचे वर्गीकरण, त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर बारावे येथील २.२३ हेक्टर जागेवरील भरावभूमी विकसित करण्यात येईल. त्याठिकाणी २०० मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाईल. तसेच मांडा येथील ९ हेक्टर जागेवर १५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी भरावभूमी विकसीत होणार आहे. (प्रतिनिधी)