गणेशोत्सवासाठी ठाण्यातून एका दिवसात ६७७ एसटी कोकणाकडे सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:48 IST2021-09-09T04:48:58+5:302021-09-09T04:48:58+5:30

ठाणे : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन मंडळाच्या ६७७ बस बुधवारी एकाच दिवसात ठाणे विभागातून कोकणाकडे ...

For Ganeshotsav, 677 STs from Thane to Konkan in one day | गणेशोत्सवासाठी ठाण्यातून एका दिवसात ६७७ एसटी कोकणाकडे सुसाट

गणेशोत्सवासाठी ठाण्यातून एका दिवसात ६७७ एसटी कोकणाकडे सुसाट

ठाणे : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन मंडळाच्या ६७७ बस बुधवारी एकाच दिवसात ठाणे विभागातून कोकणाकडे रवाना झाल्या. आतापर्यंत ८२३ बसमधून कोकणवासीय लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. खोपटस्थानकातून बुधवारी एकाच दिवसांत २७८ बस सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंधही शिथिल केल्याने यंदा राज्य परिवहन महामंडळाने १० सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी जोरदार आखणी करून ९०३ बसचे नियोजन केले. राज्यातील जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे यांच्यासह आठ डेपोंचे विशेष सहकार्य घेतले. या आठ डेपोंतून ५५० बस ठाण्यात दाखल झाल्या आहेत, तर ठाणे विभागाच्या २०० बसचा यात समावेश आहे. ठाण्याचे विभागीय नियंत्रक विनोदकुमार भालेराव आणि वाहतूक अधिकारी आर. एच. बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली या बसचे नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोकणात जाण्यासाठी रविवारपासूनच चाकरमान्यांनी सुरुवात केली. मात्र, सोमवारी १२, मंगळवारी १२८, तर बुधवारी सर्वाधिक म्हणजे तब्बल ६७७ बस संपूर्ण ठाणे विभागातून कोकणाकडे रवाना झाल्या. यात एकट्या खोपट सेंट्रल बसस्थानकातून (सीबीएस) २७८ बस सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत रवाना झाल्याची माहिती विभागीय नियंत्रक भालेराव यांनी दिली.

* बुधवारी एकाच दिवसात भाईंदरमधून ५, बोरीवली- १४९, ठाणे- २७८, कल्याण १६७, तर विठ्ठलवाडीतून ७७ बस कोकणाकडे रवाना झाल्या.

* खोपटमध्ये प्रवाशांची गर्दी-

कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी बुधवारी मोठ्या प्रमाणात ग्रुप तसेच वैयक्तिक आरक्षण असल्याने सकाळपासूनच बस पकडण्यासाठी ठाण्यातील खोपट स्थानकात मोठी गर्दी झाली होती. मात्र, एसटीच्या योग्य नियोजनामुळे तसेच प्रवाशांनीही सोशल डिस्टन्सिंग पाळल्यामुळे गर्दीवर नियंत्रण आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: For Ganeshotsav, 677 STs from Thane to Konkan in one day