गणेशोत्सवातून जगण्याची ऊर्जा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:30 IST2019-08-31T23:30:32+5:302019-08-31T23:30:37+5:30

माझा जन्म घाटकोपरचा, पण बालपण भांडुपमध्ये गेले. चौथी इयत्तेत असताना भांडुपला राहायला आलो.

 Ganesha festival gives life energy | गणेशोत्सवातून जगण्याची ऊर्जा मिळते

गणेशोत्सवातून जगण्याची ऊर्जा मिळते

संदीप सामंत

माझा जन्म घाटकोपरचा, पण बालपण भांडुपमध्ये गेले. चौथी इयत्तेत असताना भांडुपला राहायला आलो. समाजकार्याचे वेड लहानपणापासूनच होते. आईवडील आणि मामांकडून समाजकार्याचा वसा मिळाला. वडील प्रभाकर सामंत यांची आयुर्वेद औषधांची फॅक्टरी होती तसेच ते एका औषधांच्या कंपनीत कामालादेखील होते. कामावरून घरी आल्यावर परिसरातील गरजू लोकांच्या वैद्यकीय मदतीला ते धावून जात. आई सुहासिनी गृहिणी होती. तिचाही वडिलांच्या समाजकार्याला हातभार लागायचा. आमच्या सुर्वे निवास चाळीच्या समोरच उत्कर्षनगर विकास मंडळाचा गणेशोत्सव साजरा व्हायचा. गणेशोत्सवासह होळी, महाशिवरात्र, गोकुळाष्टमी, शिवजयंती आदी उत्सव साजरे व्हायचे, पण गणेशोत्सव ११ दिवस साजरा होत असल्याने या सणाचे विशेष आकर्षण असायचे. मंडळाचे कबड्डी पथक होते, त्या पथकाचा मोठा नावलौकिक होता. मला आधीच सामाजिक कार्याची ओढ होती. पाचवीपासूनच मंडळाचे काम सुरू केले. त्यावेळी छोटा कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा उचलला. तेव्हा चलचित्रांना विशेष महत्त्व होते. कालांतराने १९९० साली डोंबिवलीत राहायला आलो. मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम वेगळीच असायची. त्यामुळे डोंबिवलीत आल्यावर पहिल्या वर्षी गणपती कधी आले आणि कधी गेले, हे कळलेच नाही. हळूहळू मुंबईवरून कोकणातील बरीच मंडळी डोंबिवलीत वास्तव्याला आली आणि मुंबईच्या गणेशोत्सवाची झलक पाहायला मिळाली. डोंबिवलीत कार्यकर्ता म्हणून अचानक मित्र मंडळाच्या गणेशोत्सवापासून सुरुवात झाली. पश्चिमेतील हे एकमेव मंडळ ज्याठिकाणी गणपतीचे दर्शन खुले ठेवण्यात येते. त्यानंतर, भरत भोईरनगरमधील शिवराज मित्र मंडळात सक्रिय झालो. आज या मंडळाचे चोविसावे वर्ष आहे. तसेच शिवराज मित्र मंडळाने लहान मुले, तरुणांना व्यासपीठ मिळवून दिले. माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या श्री साईनाथ मित्र मंडळाचा कार्यकर्ता म्हणूनही कार्यरत आहे. ‘समाजाचे आपण काही देणे लागतो’ या उक्तीनुसार शैक्षणिक आणि आरोग्य शिबिरासारख्या कार्यक्रमांमधून सामाजिक कार्याचा वसा जपता येतो, हे देखील तितकेच खरे.
(कार्यकर्ता, शिवराज गणेशोत्सव मित्र मंडळ, डोंबिवली)
- शब्दांकन : प्रशांत माने

आपल्या रूढी, प्रथा, परंपरा सणांमधून जपल्या जातात. अनेकतेतून एकतेचे रूप सणांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. सण कुठलाही असो, त्याचे महत्त्व फार मोठे असते. दरवर्षी साजरा होणारा भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव असो अथवा माघी गणपतीचा उत्सव, याला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या उत्सवातून कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच वर्षभरातील ऊर्जा मिळत असते. वयाच्या नवव्या वर्षापासून मुंबई असो अथवा डोंबिवलीतील गणेश मंडळांच्या माध्यमातून जी नाळ जोडली, ती आज वयाची पन्नाशी उलटून गेली तरी कायम राहिली आहे.

Web Title:  Ganesha festival gives life energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.