गणेश विसर्जन तलाव की डम्पिंग?
By Admin | Updated: March 21, 2017 01:41 IST2017-03-21T01:41:46+5:302017-03-21T01:41:46+5:30
पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील गणेश विसर्जन तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.

गणेश विसर्जन तलाव की डम्पिंग?
डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील गणेश विसर्जन तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्याला डम्पिंगचे स्वरूप आले आहे. तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश असतानाही निर्माल्य, घरातील कचराही तलावात सर्रासपणे टाकला जात आहे. तेथील पाणी प्रदूषित झाले असून ते जलचरांच्या जीवावर बेतत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांअभावी येथील सुरक्षा वाऱ्यावर असल्याने एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल येथील रहिवाशांकडून होत आहे.
केडीएमसीच्या या गणेश विसर्जन तलावाचे सुशोभीकरण जुलै २००१ मध्ये तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधीतून आणि स्थानिक नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या पुुढाकाराने झाले. घरगुती गणपतीच्या विसर्जनाच्या सोयीसाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली. परंतु, सध्या सार्वजनिक मंडळाचे तसेच मोठ्या उंचीच्या गणपती मूर्तींचेही येथे विसर्जन होते. केवळ गणेश चतुर्थीला तलावाची स्वच्छता केली जाते. मात्र, त्यानंतर या तलावाकडे दुर्लक्ष होते.
तलावाच्या बाहेर निर्माल्य कलश आहे. परंतु, त्याचा वापर करण्याऐवजी निर्माल्य सर्रासपणे तलावात टाकले जाते. घरातील कचऱ्याच्या पिशव्याही रस्त्यांवरून जाताना तलावाच्या दिशेने भिरकावल्या जातात. त्यामुळे बराचसा कचरा हा तलावात तसेच आजूबाजूच्या परिसरात पडत असल्याने तलावाची दुर्दशा झाली आहे. प्रारंभी ग्रामपंचायत आणि आता केडीएमसीचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात रोगराईला पोषक वातावरण निर्माण झाल्याकडे रहिवासी विवेक पावणसकर यांनी लक्ष वेधले आहे. २००९ पासून त्यांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केले आहे. तसेच राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन तलावाच्या दुरवस्थेप्रकरणी ते पाठपुरावा करत आहेत. परंतु, इच्छाशक्तीच्या अभावामुळे ही समस्या आजही जैसे थे आहे, असे पावणसकर यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)