ठाण्यातील गडकरी रंगायतनची पुन्हा वाजली तिसरी घंटा, आवाज मात्र ७० डेसीबलच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:00 IST2017-12-26T14:56:06+5:302017-12-26T15:00:06+5:30
मागील १५ दिवस दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेले गडकरी रंगायतन अखेर २५ डिसेंबर पासून पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या सेवेसाठी खुले झाले आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतनची पुन्हा वाजली तिसरी घंटा, आवाज मात्र ७० डेसीबलच
ठाणे - ठाण्यातील महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली होती. त्यानंतर दुरुस्तीचे काम केल्यानंतर आता सोमवार पासून पुन्हा या नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजण्यास सुरवात झाली आहे. परंतु या थिएटरचा आवाज ७० डेसीबल पेक्षा जास्त ठेवू नये आणि नियमीत तपासणी करण्याच्या सुचना सल्लागारांनी दिल्या आहेत.
ठाण्यातील गडकरी रंयागतनचे १९७५ भुमीपुजन करण्यात येऊन तर १५ डिसेंबर १९७८ साली हे नाट्यगृह तमान ठाणेकरांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर पुन्हा १४ मार्च १९९९ साली या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नाट्यगृहाची क्षमता ९६२ एवढी आहे. दरम्यान ६ डिसेंबर रोजी गडकरी रंगायतनमधीलच खालील बाजूला असलेल्या प्रेक्षागॅलरीच्या छताचा काही भाग पडल्याची घटना घडली होती. परंतु या घटनेनंतर गडकरी रंगायतनच्या बाबतीत मागविण्यात आलेल्या तांत्रिक अहवालानुसार २५ डिसेंबर ते दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार होते. त्यानुसार आतील छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येऊन ते काम १९ डिसेंबर रोजीच पूर्ण झाले. त्यानंतर साफसफाई झाल्यानंतर सल्लागाराकरवी पालिकेने रंगायतनचा पुन्हा अहवाल मागिवला होता. त्यानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर २५ डिसेंबर अर्थात ख्रिसमसच्या दिवशी गडकरी रंगायतनची तिसरी घंटा वाजली.
दरम्यान दुरुस्तीचे काम झाले असले तरी देखील हे नाट्यगृह सुमारे ३९ वर्षे जुने असल्याने या नाट्यगृहाची काळजी घेण्याच्या सुचना सल्लागारांनी आपल्या अहवालात दिल्या आहेत. तसेच, एखादा प्रयोग सुरु असतांना आवाजाची पातळी ७० डिसेबलच्या वर जाणार नाही, याची काळजी घेण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी संपूर्ण गडकरी रंगायतनाची तपासणी करण्याचेही सांगण्यात आले आहे. त्यानुसार गडकरी रंगायतन व्यवस्थापनामार्फत देखील या सुचनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.