फ्युनिक्युलर रेल्वे अडचणीत
By Admin | Updated: November 15, 2016 04:32 IST2016-11-15T04:32:50+5:302016-11-15T04:32:50+5:30
तालुक्यातील धार्मिकस्थळ असलेल्या श्री मलंगगड येथे डोंगरावर धावणाऱ्या फ्युनिक्युलर रेल्वेचा देशातील पहिला प्रकल्प राबवण्यात येत आहे.

फ्युनिक्युलर रेल्वे अडचणीत
अंबरनाथ : तालुक्यातील धार्मिकस्थळ असलेल्या श्री मलंगगड येथे डोंगरावर धावणाऱ्या फ्युनिक्युलर रेल्वेचा देशातील पहिला प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे काम २०१४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सध्या या प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. कामात मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याने आणि कंत्राटदार सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या आर्थिक समस्येमुळे हा प्रकल्प रखडला आहे. उर्वरित ३० टक्के काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला राज्य सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली.
श्रीमलंगगड हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. तेथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना दोन तास डोंगर चढावा लागतो. त्यामुळे इच्छा असूनही भाविकांना दर्शन घेता येत नाही. मलंगगडावर जाण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांना पालखीचा आधार घ्यावा लागतो. ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे तेथे भाविकांसाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज भासत होती. तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी या गडावर जाण्यासाठी फ्युनिक्युलर रेल्वेचा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाला २००८मध्ये मंजुरी मिळाली. मात्र, मलंगगडावर रेल्वे प्रकल्प राबवण्यासाठी अनेक परवानग्या घेण्यातच चार वर्षे वाया गेली. अनेक अडचणींवर मात करत या प्रकल्पाचे काम सुरू झाले. परंतु, दोन वर्षांतच या प्रकल्पाला पुन्हा अडचणींमुळे ब्रेक लागला. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने कंत्राटदार कंपनीला सरकारने या प्रकल्पासाठी मुदतवाढ घ्यावी लागली.
गडाच्या पायथ्याशी स्टेशन उभारणे आणि गडाच्या वर स्टेशन उभारण्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. गडावर जाण्यासाठी रेल्वे रुळांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, गडाच्या मुख्य डोंगरावर पिलर उभारण्यासाठी जागा नसल्याने तेथे डोंगरावरच दगड तोडून पिलरसाठी जागा केली आहे. दगड तोडण्यासाठी लागणारे कारागीर काम करण्यास येत नसल्याने हे काम रखडले आहे. काम होत नसल्याने कंत्रादाराने मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार, सरकारने हे काम पूर्ण करण्यास मार्च २०१७ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली असून कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)